औंध : ‘पालक, शिक्षकांनी लहान मुलांच्या आरोग्याबरोबरच समतोल आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे,’ असे मत खटाव पंचायत समितीच्या सभापती जयश्री कदम यांनी व्यक्त केले.
औंध येथे राष्ट्रीय पोषण पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी माजी समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, ग्रामपंचायत सदस्या शीतल देशमुख, पर्यवेक्षिका पूजा गायकवाड, काजल कुंभार, प्रकाश कांबळे चारुशीला जाधव, लिना साळुंखे आदींची उपस्थिती होती.
शिवाजीराव सर्वगोड म्हणाले, ‘कोरोनाचा कठीण काळ असून यामध्ये बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, संगोपन करणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. त्यासाठी पालकांमध्ये याविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्पामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कार्याचे कौतुक केले पाहिजे.’
यावेळी शीतल देशमुख, शुभांगी माळी, लिना साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. चारुशीला जाधव, अलका यादव यांनी सूत्रसंचालन केले. छाया भोकरे यांनी आभार मानले.
फोटो :
औंध येथे राष्ट्रीय पोषण पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदर्शनाची शिवाजीराव सर्वगोड, सभापती जयश्री कदम, शीतल देशमुख, पूजा गायकवाड यांनी पाहणी केली. (छाया : रशिद शेख)