कऱ्हाड : सातारा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठराव मंजूर व्हावा, यासाठी राष्ट्रवादीकडून काँग्रेसची मनधरणी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांकडून काँग्रेसच्या अनेक सदस्यांना फोनाफोनी सुरू असून, कृषी सभापती पद व उपाध्यक्ष पदाचे आमिष दाखविले जात आहे. मात्र, काँग्रेसने याला बळी न पडता आपल्या सर्व सदस्यांना गैरहजर राहण्यासाठी व्हिप काढला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते जयवंत जगताप व पक्षप्रतोद अविनाश फाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रणजित निंबाळकर, महादेव पोकळे, दिंगबर आगवणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.जयवंत जगताप म्हणाले, ‘आजपर्यंत राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद सभागृहातील वागणूक व सेसबाबतची काँग्रेसबरोबर झालेली चर्चा निष्फळ ठरली आहे. काँग्रेसने सभापती व अध्यक्षपदाच्या अशा तीन निवडीवेळी राष्ट्रवादीला सहकार्य करूनही त्यांनी दिलेला शब्द कधीच पाळला नाही. आताही जिल्हा परिषद उपाध्यक्ष व कृषी सभापतीपद काँग्रेसला देतो, असे सांगितले जात आहे. आम्ही जेव्हा त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीची युती करून काँग्रेसलाही सत्तेत घ्या, असे हात जोडत होतो तीच राष्ट्रवादी आज काहीही करा; पण मदत करा, म्हणत हात टेकत आहे. वायफळ चर्चा करून शब्द न पाळणाऱ्या नेहमीप्रमाणेच फसवणूक करणाऱ्या राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादात आपण पडायचे नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. खरतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. ‘हत्ती गेला आणि शेपूट उरले,’ अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ‘उष्ट्या ताटावर बसण्यापेक्षा विरोधी बाकावर बसलेलं बरं,’ अशी आमची भूमिका आहे. राष्ट्रवादीमध्ये आज दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे अविश्वास ठरावात त्यांना यश येईल.’ असे वाटत नसल्याचेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. अविनाश फाळके म्हणाले, ‘राष्ट्रवादी कामापुरते गोड बोलते. आता अडचणीत आल्यावर दोन सभापती पदे देण्याची तयारी त्यांनी केली आहे. कृषी सभापती शिवाजीराव शिंंदे हे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आहेत. राष्ट्रवादीच्या माध्यमातून अविश्वास ठराव दाखल करून उदयनराजेंना कमीपणा देण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण उदयनराजे भोसले यांचे जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य हे एकसंधपणे निर्णय घेऊन राष्ट्रवादीचा डाव हाणून पाडतील.’ महादेव पोकळे म्हणाले, ‘काँग्रेस व राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना सर्वत्र सत्तेत एकत्र सहभाग असताना सातारा जिल्हा परिषदेत मात्र काँग्रेसला सवतीच्या पोरांसारखी वागणूक देण्याचा प्रयत्न झाला. ६ पैकी २ पदे तरी काँग्रेसला द्यायची होती. हुकूमशाहीने पाच वर्षे रेटून नेण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी राष्ट्रवादीची मते फुटतील म्हणून काँग्रेसशी त्यांनी चर्चा केली. आजपर्यंत त्यांनी दिलेला शब्द कधीही पाळला नाही व फसवणूक केली आहे. अध्यक्ष निवडीवेळी सदस्यांना फसवून सह्या घेत कृषी सभापती शिवाजीराव शिंंदे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला. हा अविश्वास ठराव दाखल करताना आम्हाला विचारले नाही. आणि आता ठरावासाठीच्या सभेवेळी मदतीसाठी आम्हाला विचारणा होते, ही बाब चुकीची आहे.’ रणजितसिंंह नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत पाच वर्षे काँग्रेसच्या सदस्यांची गळचेपी करण्याचे धोरण राबविले. कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्यावर त्यांनी अविश्वास लादला आहे. शिंंदे यांनी राजीनामा दिला असता; पण रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडून अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे शिवाजीराव शिंंदे यांनी अविश्वास ठरावास सामोरे जाण्याची तयारी करत काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली होती. आमची भूमिका स्पष्ट केली असून, अविश्वास ठरावाच्या सभेला काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहणार नाहीत. अडचणीत आल्यावर दोन सभापती पदे देणार असल्याचे सांगत असले तरी दिलेला शब्द पाळणारे हे नाहीत. त्यामुळे काँग्रेस सदस्य गळाला कधीही लागणार नाहीत.’ (प्रतिनिधी)पिक्चर अभी बाकी है...अविश्वास ठरावावेळी मदत करा, यापुढे तुम्हाला लागेल ते पाठबळ देऊ, अशी आॅफर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षांमार्फत आपणास दिल्याचे सांगत महादेव पोकळे म्हणाले, ‘राष्ट्रवादीकडून खासदार उदयनराजे भोसलेंना कमीपणा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कृषी सभापती शिवाजीराव शिंंदे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा त्यांचा प्रयोग ‘हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे,’ म्हणत खरेतर त्यांना उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्यावरही अविश्वास दाखल करायचा आहे; पण रवी साळुंखे हे आमच्यासमवेत आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीचा ‘ट्रेलर’च अयशस्वी ठरणार असल्याचे पोकळे यांनी स्पष्ट केले.’...तर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाईसभेस राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित राहू नये, असा व्हिप बजाविण्यात आला आहे. व्हिपचे उल्लंघन केल्यास संबंधित सदस्यांवर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत सदस्य रद्दसाठीची कारवाई करण्यात येणार असल्याचे विरोधी पक्षनेते जयवंत जगताप व पक्षप्रतोद अविनाश फाळके यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसला दुय्यम स्थान देत शब्द न पाळणाऱ्या राष्ट्रवादीला यापुढे मदत मिळणार नसल्याचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही स्पष्ट केले.
राष्ट्रवादीकडून काँग्रेसची मनधरणी
By admin | Updated: July 29, 2016 23:20 IST