महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिध्द असलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. शनिवार व रविवारपासून महाबळेश्वरमध्ये हजारो पर्यटकाची वाहने मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत. यादरम्यान महाबळेश्वर, प्रतापगड, अंबेनळी घाटातील लहान मोठ्या धबधब्यावर पर्यटकाची प्रचंड प्रमाणात गर्दी पाहण्यास येत होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता जाहीर केली आहे. यानुसार शनिवार सकाळपासून महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली केली आहेत. ही बातमी सोशल माध्यमावरून वाऱ्यासारखी पसरू लागली. त्यामुळे महाबळेश्वरमधील वेण्णालेक, मुख्य बाजारपेठ व अंबेनळी घाटात पर्यटकाची मोठ्या प्रमाणात रेलचेल वाढू लागली. मेटतळे गावाशेजारील धबधब्यावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काही पर्यटकांनी धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. तर काही सेल्फी व फोटो काढण्यात मग्न होत असताना दिसून येत आहेत.
महाबळेश्वरची मुख्य बाजारपेठ खुलताच पर्यटकांनी नवीन कपडे खरेदी, गरमागरम चणे शेंगदाणे, चप्पल, रेनकोट, सिरिप खरेदी करण्यासाठी पर्यटकाची गर्दी होऊ लागली आहे. तर महाबळेश्वरमधील हॅाटेल तीन महिने बंद असल्यामुळे सर्व हाॅटेल पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. सोमवारी पर्यटकांनी ॲानलाईनचा फंडा वापरून हाॅटेलच्या खोल्या अगोदरच बुकिंग करण्यात आल्या होत्या. त्यामुळे महाबळेश्वरमधील काही ताराकित हाॅटेल, फुल झालेली दिसून येत होती.
पर्यटकाच्या वाहनाची वर्दळ वाढू लागल्या आहेत. यामुळे हाॅटेल कॅनव्हासर व गाईड व्यावसायिक पुन्हा आपल्या कामावर खोली भरण्यासाठी जोमाने लागले दिसून येत आहेत. वेण्णा लेकवर काही हौशी पर्यटकांनी मुसळधार पावसाच्या सरी अंगावर झेलत घोड्यावरून रपेट मारत होते.
चौकाचौकांत स्थानिक काळीपिवळी टॅक्सीही येऊन उभ्या राहिल्या आहेत. महाबळेश्वर पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.
चौकट :
तपासणी करूनच प्रवेश
परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांची कोरोना चाचणी केल्यानंतर सोडले जात आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदतही होणार आहे.
२१महाबळेश्वर-ट्युरिस्ट
आंबेनळी घाटातील धबधब्याजवळ रविवारी पर्यटकांनी गर्दी केली होती.