सातारा : जिल्ह्यात १७१ ग्रामपंचायतींपैकी १५0 ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर झाला. काही ठराविक ग्रामपंचायती वगळता इतर ठिकाणी राष्ट्रवादीने आपले वर्चस्व सिध्द केले. तब्बल ७0 ग्रामपंचायती अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. त्यातही बहुतांश ग्रामपंचायती राष्ट्रवादीला मानणाऱ्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीच कारभारी असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले. कोडोली, अतित, वाढे, नागठाणे, तासगाव, कोपर्डे हवेली, उंब्रज, चिंचणेर वंदन या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीने आपले वर्चस्व राखले. वाई तालुक्यातील जांब, केंजळ या दोन ग्रामपंचायती काँगे्रसने ताब्यात घेतल्या. पाटण तालुक्यातल्या दोन ग्रामपंचायतीवर भगवा फडकला. माण तालुक्यात मात्र राष्ट्रवादीला खाते खोलता आले नाही. जावळी तालुक्यातील तीन गावांचा अपवाद वगळता इतर तालुक्यांत राष्ट्रवादीने बाजी मारली. सातारा तालुक्यात ९२ ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीने विरोधकांचा ‘व्हाईटवॉश’ केला. (प्रतिनिधी)विरोधात मतदान केल्याने घरावर दगडफेक नागठाणे : विरोधात मतदान का केले, याचा जाब विचारत पाटेश्वरनगर (ता. सातारा) येथील सुरेखा गणेश भोंडवे यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी चारजणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज निवृत्ती सावंत, तानाजी राजाराम सावंत, प्रदीप अंकुश माने, नितीन बाळकृष्ण सावंत (रा. पाटेश्वरनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पतीला मारहाण करून घराच्या खिडकीच्या काचाही फोडण्यात आल्या, असे सुरेखा भोंडवे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
गावागावांत राष्ट्रवादीचेच कारभारी !
By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST