सातारा : राष्ट्रीय पक्षी म्हणून मोराला ओळखले जाते. साधारण डोंगरी व जंगलात आढळणारा हा पक्षी मागील काही दिवसांपासून शहरात त्यांचे वास्तव्य दिसून येत आहे. अन्न व पाण्यासाठी चक्क मोर शहरामध्ये भटकंती करत असल्याचे दिसून आले आहे.सातारा शहरालगत असणाऱ्या डोंगरावर अनेक प्राणी आहेत. शहरापासून जवळच असणाऱ्या या डोंगरामध्ये अनेक वेळा बिबट्या दिसून येतो. तर सकाळ व सांयकाळी अनेक पक्ष्यांची किलबिल ऐकू येते; परंतु ज्या पद्धतीने मानवी वस्ती डोंगरालगत वाढत आहे. त्यामुळे अन्न व पाण्याच्या प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक पक्षी, प्राणी शहराच्या दिशेने येत असल्याचे दिसून येत आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे मागील काही महिन्यांमध्ये खिंडवाडी येथील महामार्गावर दोन बिबट्यांना जीव गमवावा लागला होता. तर नुकतेच एक भेकर सदर बझार येथे दिसून आला. नागरिकांनी त्याला पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले होते. वारंवार या जंगली पक्ष्यांचे शहरात येण्याचे प्रस्त वाढले असून, यांना अन्न, पाण्याची कमतरता असल्याने या शोधात शहराकडे येत असल्याचे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे.दरम्यान, सदर बझार येथील पारशी अगेरी व सैनिक स्कूलच्या परिसरात काही दिवसांपासून सकाळच्या वेळी मोर दिसून येत आहेत. काही मोर मानवी वस्तीत आल्यानंतर नागरिकांची वर्दळ वाढताच निघून जात आहेत. अनेकांनी मोराला पाहून आरडाओरड करत असल्याने भयभीत होऊन मोर गायब होतो. तर काहीवेळा मोकाट कुत्री याचा पाठलाग करत असताना दिसून आले. (प्रतिनिधी)डोंगरातील खाद्य वणव्यामुळे होरपळून जात असल्याने राष्ट्रीय पक्षी मानला गेलेला मोर खाद्याच्या शोधात चक्क मानवी वस्तीत येऊ लागला आहे. मोराच्या हालचालीवरून अन्न व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येत असल्याचे येथील काही पक्षीमित्रांचे म्हणणे आहे. भविष्यात या मोरांना वास्तव्यासाठी शहराकडे धाव घ्यावी लागली तर नवल वाटायला नको, असेही पक्षीप्रेमींचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय पक्ष्यांची शहरी सफर!
By admin | Updated: April 3, 2015 23:59 IST