सातारा : कोरेगाव तालुक्यातील पाच वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या प्रकरणातील नराधमाला कठोर शासन झालेच पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशा घोषणा देण्यात आल्या. कोरेगाव तालुक्यातील अत्याचाराच्या घटनेनंतर सातारा जिल्हा हादरून निघाला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सामाजिक क्षेत्रांतील शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चात सहभाग घेतला होता. जिल्हाधिकारी डॉ. अश्विन मुदगल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणातील आरोपीवर महिला अत्याचार कायद्यांतर्गत कार्यवाही व्हावी. तसेच हा खटला जलद न्यायालयात चालवून गुन्हेगारावर तत्काळ शिक्षा करावी, या घटनेने मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, याप्रकरणी समाजाच्या भावना तीव्र आहेत. यावेळी सागर साळुंखे, संतोष ठोंबरे, मारुती जानकर, रामभाऊ कचरे, समीर माने यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी आदेश नितोळे, अशोक शेडगे, प्रल्हाद जाधव, रामचंद्र ठोंबरे, डॉ. आशिष जरग, सागर ठोंबरे, रवींद्र भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नराधमाला कठोर शासन करायला पाहिजे!
By admin | Updated: July 31, 2016 00:08 IST