औंध : श्रीयमाईदेवीच्या यात्रेनिमित्त औंध येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरच्या नंदू आबदार याने सुनील साळुंखे (खवासपूर) याच्यावर मात करून चुरशीच्या लढतीत पोकळ घिस्सा डावाने बाजी मारली. काही मिनिटातच झालेल्या या कुस्तीमुळे प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या कुस्ती मैदानाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत केले. या आखाड्याच्या कुस्त्या पाहण्यासाठी उपसभापती धनाजी पावशे, चंद्रकांत पाटील, प्रा. बंडा गोडसे, शैलेश जाधव, नवल थोरात, शिवाजी सर्वगोड, शशिकांत जाधव, जालिंदर राऊत, सपोनि उदय देसाई यांची उपस्थिती होती.दुपारपासून सुरू झालेल्या या आखाड्यात अत्यंत चुरशीच्या व प्रेक्षणीय लढती झाल्या. प्रथम क्रमांकाची कुस्तीसाठी पंच म्हणून विकास जाधव व सदाशिव पवार यांनी काम पाहिले. मान्यवरांच्या हस्ते ही कुस्ती लावल्यानंतर कुस्ती सुरू णाली व मैदानात शांतता पसरली.कुस्तीच्या लढतीत सुनी साळुंखे व नंदू आबदार यांनी पंजाची पकड घेतली. काही क्षणातच सुरुवातीस सुनील साळुंखेने एकेरी पटाचा वापर करीत नंदू आबदारचा कब्जा घेता व डावा पवित्रा घेतला. नंदू आबदारने आपली सुटका करत एकेरी पट काढत पोकळ घिस्सा डाव करून पाच मिनिटातच कुस्ती जिंकली. १,५१,००० रुपये इनामाची ही कुस्ती अत्यंत प्रेक्षणीय झाली. एक लाख रुपये इनामाची द्वितीय क्रमांकाची कुस्ती बापू मंडले (सोलापूर) यांनी जिंकली. ७५००० रुपये इनामाची कुस्तीत माऊली जमदाडे (गंगावेश) यांनी पांडुरंग मांडवे यांना पराभूत केले. ५१ हजाराची कुस्ती रामदास पवर व औदुंबर मासा यांच्यात बरोबरीत सुटली. हसन पटेल यांची कुस्ती निकाली होण्यासाठी पंचांनी पाच मिनिटाचा जास्त वेळ दिला. यात हसन पटेल यांनी गुणांवर कूस्ती जिंकली. (वार्ताहर)
नंदू आबदारने जिंकले औंधचे मैदान
By admin | Updated: January 15, 2015 23:31 IST