लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : येथील राजवाडासमोरील अभयसिंहराजे भोसले संकुलाच्या पार्किंगमधील अतिक्रमण काढण्यात यावे, या मागणीसाठी आरोग्य सभापती वसंत लेवे आणि नगरसेविका सुनीता पवार यांनी बुधवारी सकाळी पालिकेच्या दालनात उपोषण केले. यावेळी लेवे यांनी काही सत्ताधारी नगरसेवकांवर हप्तेबाजीचा आरोप केला असून, संबंधित नगरसेवकांमुळेच अतिक्रमणाला अभय मिळत असून त्यामुळेच मी गुरुवारी राजीनामा देणार असल्याचे वसंत लेवे यांनी सांगितले.येथील राजवाडा बसस्थानकासमोरील अभयसिंहराजे भोसले संकुलाच्या पार्किंगमधील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या संकुलाच्या पार्किंगमध्ये गणेश मूर्तींचे स्टॉल लावण्यास आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी विरोध केला होता. यावरून राजीनामा देण्याचाही त्यांनी इशारा दिला होता. मात्र, खासदार उदयनराजेंनी त्यांची समजूत घालून राजीनामा नाट्यावर पडदा टाकला होता. परंतु, पुन्हा हीच परिस्थिती निर्माण झाल्याने लेवे यांनी सत्ताधारी नगरसेवक आणि पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ उपोषण सुरू केले. त्यामुळे सत्ताधाºयांमधील दुफळी स्पष्टपणे दिसून आली.पाहुणचारपेक्षा कारवाई करा !अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलामध्ये पे अॅण्ड पार्कचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. असे असताना लगेच त्या ठिकाणी स्टॉलना परवानगी कशी दिली जाते. काही नगरसेवकांचाच या प्रकाराला अभय असल्यामुळे हे अतिक्रमण होत आहे. या अतिक्रमणधारकांचा मुख्याधिकाºयांनी पाहुणचार करण्यापेक्षा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही लेवे यांनी यावेळी केली.विरोधकांचाही पाठिंबा...व्यापारी संकुलामध्ये सत्ताधारी नगरसेवकांचेच लागेबांधे असल्याचे वसंत लेवे यांचे म्हणणे आहे. स्वत:च्या आघाडीच्या विरोधातच लेवे यांनी दंड थोपटल्याचे पाहून विरोधी पक्षनेते अशोक मोने, किशोर पंडीत, हेमांगी जोशी, सुनीता पवार यांनी त्यांना पाठींबा दिला. या ठिकाणी नेमके कोणी अतिक्रमण केले आहे, हे सांगण्यास मात्र लेवे यांनी नकार दिला.
चक्क पालिका सभापती उपोषणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 23:54 IST