सातारा : शहरापासून जवळच मेढा रस्त्यावर असलेल्या हमदाबाज गावाच्या हद्दीतील उसाच्या शेतात एक गवा गुरुवारी मृतावस्थेत आढळून आला. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असले, तरी पायाला झालेल्या जखमेमुळे गँगरिन होऊन गवा मृत्युमुखी पडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. सातारा तालुक्यातील हमदाबाज येथील केशव शिवराम ढाणे यांच्या उसाच्या शेतात गवा मृतावस्थेत आढळल्याचे वृत्त मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. गुरुवारी सकाळी ही खबर मिळाल्यानंतर साताऱ्याचे उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनसंरक्षक महादेव मोहिते, वनक्षेत्रपाल व्ही. आर. शिंदे तातडीने घटनास्थळी धावले.आजूबाजूला सर्वत्र उसाची आणि मक्याची शेते, एका बाजूला ओढा आणि दुसऱ्या बाजूला वेण्णा नदीचे पात्र अशी भूरचना असल्याने तहानेने किंवा भुकेने गवा दगावला असण्याची शक्यता कमी आहे. वनपाल सुनील भोसले, वनरक्षक दीपक गायकवाड, प्रशांत पडवळ, नीलेश रजपूत, मारुती माने, वनमजूर कृष्णा पवार यांनी घटनास्थळी जाऊन जेसीबीच्या साह्याने मृत गवा ट्रॅक्टर-ट्रॉलीतून साताऱ्याला आणला. सातारा येथील गोडोली वनरोपवाटिका परिसरात गव्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दुपारी त्याच परिसरात त्याचे दफन करण्यात आले. (प्रतिनिधी)‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते वृत्तडोंगरी भागातून सहसा सपाटीकडे न येणारे गवे साताऱ्याच्या आसपास फिरत असल्याचे ‘लोकमत’ने सर्वप्रथम समोर आणले होते. काही गवे महादरे परिसरात आढळून आले होते, तर एक गवा सारखळ परिसरातील शेतांचे नुकसान करीत होता. शेतकऱ्यांनी त्याला अनेकदा पाहिले होते. अनेकांनी तो लंगडत असल्याचे सांगितले होते. हमदाबाजमध्ये मृतावस्थेत आढळलेला गवा तोच असावा, असा अधिकाऱ्यांचा कयास आहे. बाकीचे गवे डोंगरी भागात परतले असावेत आणि पायाच्या जखमेमुळे या गव्याला डोंगरावर जाता आले नसावे, असा अंदाज आहे.वयात आलेला नरमृत गवा तीन वर्षे वयाचा असावा असा अंदाज आहे. तो युवावस्थेतील नर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचे वजन सुमारे ७०० ते ८०० किलो असल्याचा अंदाज असून, दोन-तीन दिवसांपूर्वीच तो मृत्यू पावला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हमदाबाज येथे गवा मृतावस्थेत !
By admin | Updated: April 7, 2016 23:51 IST