कऱ्हाड तालुक्यातील मलकापूर येथील युवकाने सोशल मीडियावरून अनोळखी मुलींशी संपर्क केला. त्यावेळी त्याची मुंबईतील एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी ओळख वाढली. त्यांचे प्रेम जुळल्याने तो मुलीला भेटायला मुंबईला रवाना झाला. मुलाने प्रेमाची भुरळ घातल्याने तेथून दोघे मलकापुरात आले. दरम्यान, मुलीच्या वडिलांनी मुंबईत तक्रार दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला. कऱ्हाडचे पोलीस उपअधिक्षक रणजीत पाटील यांनी तपासाच्या सूचना दिल्या. निर्भया पथकाच्या अतुल देशमुख, सोनाली कदम, हवालदार फल्ले यांनी मलकापुरात संशयित युवकासह पीडित मुलीला ताब्यात घेतले. युवकाकडे चौकशी केल्यावर सोशल मीडियावरून ओळख झाल्याचा प्रकार उघडकीस आला. मुंबई पोलीस कराडात आले. त्यांनीही चौकशी केली. संशयित युवकाला मुंबईला नेले. त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने त्याला अटक झाली. या युवकाने अनेक मुलींशी सोशल मीडियावरून ओळख वाढवत संपर्क ठेवल्याचे समोर येत आहे. याचाही तपास सुरू आहे.
मलकापुरातील युवकाला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:07 IST