पुसेगाव :
कोरोना तसेच अवकाळीच्या पार्श्वभूमीवर पुसेगावसह परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यातच महावितरणचे अधिकारी कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करीत आहेत. यामुळे वीज वितरणचे अधिकारी सोमवारी पुसेगाव येथे वीजतोडणीसाठी आले असता संतप्त शिवसैनिकांनी यावेळी त्यांची गाडी फोडली.
दरम्यान, खटाव येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता शैलेंद्र राक्षे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चार जणांवर शासकीय कामात अडथळा आणून शिवीगाळ दमदाटी करत, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, सातारा येथील अधीक्षक अभियंता कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या थकीत वीजबिल वसुली आदेशानुसार सोमवारी सकाळी ११ वाजेपासून वडूज, खटाव व पुसेगाव वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वसुलीच्या कामात व्यस्त होते. पुसेगावातील एका ग्राहकाच्या घरी जाऊन थकीत वीजबिल भरण्यासंदर्भात चर्चा झाली. मात्र, संबंधितांनी बिल भरण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांचा वीजपुरवठा तोडण्यात आला. ही माहिती मिळताच पुसेगाव येथील प्रताप जाधव, सुरज जाधव (दोघे रा. पुसेगाव), दिनेश देवकर (रा. वेटणे), ज्ञानेश्वर काटकर (रा. काटकरवाडी) यांनी येथील छत्रपती शिवाजी चौकात वसुली अधिकाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. वीज वितरण कंपनीने वसुलीसाठी भाड्याने घेतलेल्या गाडीच्या पुढील काचेवर दगड मारून सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान केले. त्यामुळे चार जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फोटो ओळ : १५पुसेगाव-एमएसईबी
पुसेगाव येथे सोमवारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या गाडीच्या काचा शिवसैनिकांनी फोडल्या. यावेळी शिवसेनेचे प्रताप जाधव, सुरज जाधव, ज्ञानेश्वर काटकर, दिनेश देवकर यांनी चर्चा केली. (छाया : केशव जाधव)