फलटण : महावितरणच्या वीजबिल वसुलीचा तगादा थांबावा, वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी फलटणमधील सर्व पक्षांनी व सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, शेतकरी व वीजग्राहकांनी शुक्रवारी महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना एकत्र येत निवेदन दिले.
या निवेदनात गेल्या दहा महिन्यांचे विजेची थकबाकी माफ करावी व ज्या ग्राहकांचे वीजकनेक्शन तोडलेले आहे ते त्वरित चालू करावे. जानेवारी २०२१ चे बिल व थकित बिल यांचे समान दहा महिन्यांचे टप्पे करून मिळावेत, असे निवेदन दिले आहे. जर कोणाचे वीज कनेक्शन कट केले तर महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन उभा करू, असा इशाराही यावेळी आमिर शेख यांनी दिला.
निवेदन देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आमीर शेख, भाजप शहराध्यक्ष अमोल सस्ते, ‘मनसे’चे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, मेहबूबभाई मेटकरी, काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे फलटण तालुकाध्यक्ष ताजुद्दीन बागवान, आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, सनी कदम, वशीम मणेर, राजू काळे, तानाजी कदम, रणजित भुजबळ, तुषार राऊत, मोहन पोतेकर, शंकर मुळीक, विशाल पोतेकर, रामभाऊ शेडे तसेच सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.