कोरेगाव : ‘सध्या सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यामध्ये स्वारस्य आहे.
त्यामुळे सर्वच लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी आहे. आरोग्य विभागाच्या
सर्वच यंत्रणा एकाच छताखाली असल्याने तेथे भल्या पहाटेपासून रात्री
उशिरापर्यंत गर्दी असते. त्यातूनच कोरोना वाढत चालला आहे. कोरोना सुपर
स्प्रेडर बनत चालले असल्याने लसीकरण केंद्रे तातडीने जिल्हा परिषद
प्राथमिक शाळेत स्थलांतरित करावीत,’ अशी मागणी आमदार महेश शिंदे यांनी केली आहे.
कोरेगाव मतदारसंघातील कोरोनाविषयक भीषण परिस्थिती त्यांनी पत्रकार
परिषदेत मांडली. यावेळी सुनील खत्री, संतोष जाधव, राहुुल प्र. बर्गे,
माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे उपस्थित होते. ग्रामीण भागात
प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांच्या एकाच छताखाली तपासणी, बाह्य
रुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभाग एकाच छताखाली असल्याने मोठी गर्दी होते. तेथेच कोरोनाचा प्रसाद एकमेकांना दिला जातो आणि त्यातून
रुग्णसंख्या वाढत चालली असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले.
उपजिल्हा रुग्णालयात काडसिद्ध आणि जितराज मंगल कार्यालयाच्या काडसिद्धेश्वर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांची
माहिती घेतल्यावर त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि ट्रॅव्हल हिस्ट्री
पाहिली तर त्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्य:स्थितीत सर्वच निर्णयाचे अधिकार हे शासकीय अधिकाऱ्यांकडे आहेत, ते ग्रामीण भागात जात नाहीत. ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी हे देखील फिरकत नाहीत. आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका प्रामाणिकपणे काम करतात.
मात्र, त्यांनाही मर्यादा आहेत. त्यामुळे आम्ही आता ग्रामीण भागात
कोरोनाला रोखण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला आहे. बोरजाईवाडीत राजकारणविरहित वॉर्डस्तरीय समित्यांची स्थापना केली आहे. प्रत्येक सदस्याला बरोबर घेत कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्यावर कोरोनाचा वेग निश्चितपणे कमी होईल, असा विश्वास देखील आ. शिंदे यांनी व्यक्त केला.
चौकट :
लस घेणार नाही; घेऊ देणार नाही
युवक कार्यकर्त्यांचा निर्धार
जोपर्यंत आरोग्य केंद्राच्या इमारतीतून लसीकरण केंद्र बाहेर जिल्हा परिषद
शाळेत स्थलांतरित करत नाहीत, तोपर्यंत आम्ही युवक कार्यकर्ते लस घेणार नाही. आमदार महेश शिंदे यांनी लसीकरण केंद्रांबाबत घेतलेली भूमिका योग्य आहे. जोपर्यंत प्रशासन या भूमिकेशी अनुसरून निर्णय घेत नाही, तोपर्यंत आम्ही लस घेणार नाही आणि कोणालाही घेऊ देणार नाही. ग्रामीण भागात तसाच प्रचार करणार असून, त्यातून कोणतीही दुर्घटना घडल्यास त्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा नीलेश नलवडे, संतोष जाधव, संजय काटकर, संदीप केंजळे, श्रीकांत बर्गे, जवानसिंग घोरपडे, पंकज गोडसे यांच्यासह युवक कार्यकर्त्यांनी दिला आहे.