सातारा : निसर्ग सगळ्यांनाच सगळं देतो, असे नाही. ज्यांना द्यायला तो कमी पडतो, त्यांच्या ठायी काहीतरी भरपूर चांगल्याची साठवण त्याने केलेली असते. फक्त हे समजण्यासाठी काही काळ जावा लागतो, हे निश्चित. खडगाव, ता. जावळी येथील सुनीता रामचंद्र शिरटावले यांचीही कहाणी अशीच रोमांचक; पण प्रेरणादायी आहे.शारीरिक कमतरतेमुळे सुनीता शिरटावले यांना विवाह करता आला नाही. शिक्षणाबरोबरच नोकरीची संधी मिळाली म्हणून त्यांनी अंगणवाडी सेविका म्हणून काम करायला सुरुवात केली. शारीरिक व्यंग आणि आयुष्यातील एकाकीपणा त्या मुलांच्या सानिध्यात राहून घालवण्याचा प्रयत्न करू लागल्या. घरी आई-वडील भाऊ आणि वहिनी अशा चौकोनी कुटुंबात राहत असलेल्या सुनीता यांच्या आयुष्यात एका मागून एक संकटे येत गेली. वडिलांचे निधन झाले. त्यानंतर भावाचा मृत्यू झाला. विधवा आई आणि वहिनीला सांभाळत त्यांनी महिलांचा मवाळपणा सोडला आणि कणखर बनल्या. भावाच्या मृत्यूनंतर वहिनीला त्या जागी कामावर लावण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. हरतऱ्हेने प्रयत्न करून त्यांनी वहिनीला तिच्या हक्काची नोकरी मिळवून दिली. पुरोगामी विचारांचा पगडा असणाऱ्या सुनीता यांनी काम करत-करत मुक्त विद्यापीठातून समाजकार्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला. विविध पथनाट्यांच्या माध्यमातून लेकी वाचविण्याचा जागरही त्यांनी केला. आपल्या गावातील महिलांना बचत आणि आर्थिक सबल करण्यासाठी त्यांनी बचत गटाची सुरुवात केली. कितीही गडबड असली तरीही ध्यानधारणा आणि आराधना यासाठी त्या वेळ काढतात. यामुळे आंतरिक शक्ती मिळते, असे त्यांना वाटते. सामाजिक काम करण्यास वेळच मिळत नाही, आता होत नाही, अशी कारणे अनेकदा ऐकायला मिळातात. परंतु, एखादे ध्येय, उद्दिष्ट्य डोळ्यासमोर कोणतीही नैसर्गिक अडथळे कमी वाटायला लागतात, हे त्या सांगतात. (प्रतिनिधी)पुरुषांनाहीलाजवेल असे कामखडगाव येथे राहणाऱ्या सुनीता शिरटावले यांना रोज तीन डोंगर चढून मोरबाग येथे अंगणवाडीत यावे लागते. हा रस्ता त्यांचा इतका सवयीचा आहे की, अवघ्या एका तासात डोंगर चढून त्या अंगणवाडीत पोहोचतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी घराचे काम काढले. छोटेसे आणि टूमदार घर बांधण्यासाठी लागणारी सगळी पुरुषी झगझग त्यांनी केली. त्यानंतर जेव्हा कौलांना रंग द्यायची वेळ आली, तेव्हा त्यांनी चक्क रंगाचा डबा उचलला आणि कौले रंगवायला सुरुवात केली. ग्रामस्थांना मदतीचा हात देणाऱ्या सुनीता पुरुषांना लाजवेल इतक्या खंबीरपणे सर्वांना आधारवड वाटतात. त्यांच्यातील धडाडी, काम करण्याची उर्जा पाहिल्यानंतर अनेकजण त्यांच्याकडून प्रेरणा घेत असतात.
अंगणवाडीतील मुलांच्या प्रेमापुढं मार्गातील डोंगरही खुजे!
By admin | Updated: January 2, 2015 23:58 IST