लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘शहरातील साखळीपुलाजवळ नगरपंचायतीने लाखाे रुपये खर्चातून उभारलेल्या व गेली दीड वर्षापासून वापराविना बंद असलेले सार्वजनिक स्वच्छतागृह तत्काळ खुले करण्यासाठी साेनेरी ग्रुपने साेमवार, दि. ८ फेब्रुवारीपासून उपाेषणाचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती साेनेरी ग्रुपचे अध्यक्ष संताेष नलावडे यांनी दिली.
यासंदर्भातील एक निवेदन साेनेरी ग्रुप, साेनेरी सखी मंच, काेरेगाव नगरविकास कृती समिती, जुना स्टँड परिसरातील व्यावसायिक, नागरिकांच्या वतीने नगरपंचायतीचे नगराध्यक्षा रेश्मा काेकरे, मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्यासह प्रशासनाला दिले आहे. असंख्य महिला, नागरिकांच्या वतीने साेनेरी ग्रुप व साेनेरी सखी मंचने नगरपंचायत प्रशासनाचे सातत्याने लक्ष वेधूनही जनतेच्या साेयीचे असलेल्या साखळी पुलानजीकचे सार्वजनिक स्वच्छतागृह जाणीवपूर्वक खुले केले जात नाही. नगरपंचायतीने पूर्वीचे स्वच्छतागृह पाडून त्याठिकाणी नव्याने स्वच्छतागृह उभारले असून त्याचे संपूर्ण काम पूर्ण झालेले असतानाही ते जाणीवपूर्वक बंद ठेवून लाेकांची, परिसरातील व्यापारी, व्यावसायिकांची माेठी गैरसाेय निर्माण केली आहे. वास्तविक जुना स्टँड परिसरात ते एकमेव स्वच्छतागृह आहे. हे स्वच्छतागृह बंद असल्याने लाेकांची व महिलांची खूप अडचण हाेत असते. यासाठी वारंवार निवेदने देऊन, तक्रारी अर्ज देऊनही जाणीवपूर्वक लाेकांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे.दाेन दिवसांत साखळी पुलाजवळील सार्वजनिक स्वच्छतागृह खुले न केल्यास नगरपंचायत प्रशासनाच्या आडमुठ्या धाेरणाविराेधात शहरातील महिला व नागरिक साेमवार, दि. ८ फेब्रुवारीपासून त्या स्वच्छतागृहाच्या दारातच आमरण उपाेषण करणार आहेत.
नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देताना साेनेरी ग्रुपचे अध्यक्ष संताेष नलावडे, पृथ्वीराज बर्गे, अजित बर्गे यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी विजय ओसवाल, अनिकेत बर्गे, नगरसेवक नितीन ओसवाल, किशाेर बर्गे आदी उपस्थित हाेते.