सातारा : गंभीर गुन्ह्यात मोक्कांतर्गत कारवाई झाल्यापासून तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला सातारा पोलिसांच्या डी. बी. पथकाने पुणे जिल्ह्यातील भिगवण येथून अटक केली. अमोल विजय देशमुख (वय ३१,रा. गोळीबार मैदान, गोडोली, सातारा) असे अटक झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमोल देशमुख याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तेव्हापासून देशमुख हा पसार झाला होता. त्याचा पोलीस शोध घेत होते; परंतु तीन वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत होता. तो भिगवण परिसरात आपली ओळख बदलून रहात असल्याची गोपनीय माहिती सातारा शहराच्या गुन्हे प्रकटीकरणाला मिळाली. त्या आधारे पथकाने भिगवण येथे जाऊन सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो अमोल विजय देशमुख असल्याची खात्री झाली. त्यानंतर त्यास सातारा शहर पोलीस ठाण्यात आणून अटक केली.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आचल दलाल, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, जोतिराम पवार, गणेश घाडगे, अभय साबळे , संतोष कचरे व विशाल धुमाळ यांनी ही कारवाई केली.