लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पुणे व सातारा जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वार महिला, जोडपी यांचा पाठलाग करून धारदार शस्त्रांचा धाक दाखवून ऐवज लुटणाऱ्या टोळीतील तिघांवर जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मोक्कांअतर्गत कारवाई केली आहे.
टोळीप्रमुख महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे (रा. मोतीचौक, फलटण), विकास उर्फ लाल्या उर्फ कानिफनाथ अनिल जाधव (रा. बावधन, ता. वाई), हिमालय सतीश धायगुडे (रा. खेड बु., ता. खंडाळा) अशी मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. टोळी प्रमुख महेश शिरतोडे याच्यावर तब्बल २५ गुन्हे दाखल आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सोळशी, ता. कोरेगावच्या हद्दीत २५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास एक जोडपे डोंगरातील पवनचक्कीला तयार केलेल्या रस्त्याने केदारेश्वर मंदिराकडे जात होते. त्यावेळी अनोळखी तिघाजणांनी त्यांना दगडाचा धाक दाखवून, फिर्यादीच्या पतीस हाताने मारहाण करुन सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाइल असा २ लाख ५१ हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला होता. याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांच्या तपासामध्ये हा गुन्हा टोळीप्रमुख महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे, विकास उर्फ लाल्या उर्फ कानिफनाथ जाधव, हिमालय धायगुडे यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्यात चोरीस गेलेला ऐवज, रोख रक्कम व आरोपींनी वापरलेली वाहने व मिळालेल्या पैशांतून खरेदी केलेली वाहने असा एकूण ४ लाख ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या आरोपींनी संघटितपणे फलटण ग्रामीण, फलटण शहर, वाई, पुसेगाव, सातारा शहर, सातारा तालुका, महाबळेश्वर, लोणंद, शिरवळ, खंडाळा तसेच पुणे जिल्ह्यात बारामती तालुका या पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केले असल्याचे उघडकीस आले. महामार्गावर व इतर जोडरस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी दुचाकीस्वार व महिला प्रवासी, जोडपी यांच्या वाहनांचा पाठलाग करून त्यांच्याजवळील ऐवज शस्त्रांचा धाक दाखवून, त्यांना दुखापत करून जबरदस्तीने या टोळीने ऐवज चोरी केल्याचे निष्पन्न झाले. यामुळे टोळीवर मोक्कांतर्गत कारवाईकरिता प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिली असून या गुन्ह्याचा तपास गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण, कॅम्प कोरेगाव हे करत आहेत.
दरम्यान, मोक्का प्रस्ताव मंजुरीकरिता पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, एलसीबीचेे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सपोनि स्वप्नील घोगडे, हवा. प्रवीण शिंदे, सचिन जगताप, वाठार पोलीस ठाण्यातील तानाजी चव्हाण यांनी सहभाग घेतला आहे.