‘दीवार’ चित्रपटाचा ‘रिमेक’ बनविण्याचा निर्णय ‘बॉलीवूड’मध्ये घेतला गेला. दोन भावांची स्टोरी नव्या शैलीत लिहून कलाकारांचा शोध सुरू झाला. निर्मात्यानं दिग्दर्शकाला सांगितलं,’ मेरे पिक्चर में नये चेहरे चाहिए. दोनो असल में भाई-भाई होंगे तो बहोतही अच्छा!’ मग काय... पळापळ सुरू झाली. प्रत्यक्षात ‘भाऊ-भाऊ’ पण ‘स्वतंत्र कर्तृत्व’ असलेल्या मंडळींच्या शोधात पिक्चरची टीम बाहेर पडली. कुणीतरी त्यांना पुण्यात सांगितलं की, ‘सातारा में जाओ. हर तालुके में एक से एक भाई मिलेंगे. वहॉँ आमदार खुद कलाकार .. और उनके भाई भी अॅक्टींग में माहीर.’साताऱ्याच्या राजकारणातल्या ‘भाई-भाई’ कलाकारांचं कोडकौतुक ऐकून टीम खंबाटकी घाट ओलांडून बोपेगावजवळ आली. नुकतंच आजारातून उठलेले मकरंद आबा आनेवाडी टोल नाक्याच्या दिशेला तोंड करून गंभीरपणे विचार करत बसलेले. कदाचित नाक्यावरच्या ‘अण्णा’वर कोणता उतारा शोधावा, असा प्रश्न त्यांच्या डोक्यात घोळत असावा. त्यांना त्यांच्या भावांबद्दल टीमनं विचारलं, तेव्हा त्यांनीच उलट विचारलं, ‘कौनसा भाई... खंडाळावाला मिलिंददादा या कोरेगाववाला नितीनकाका?’ टीम गोंधळात पडली. आबा वाईचे. मात्र त्यांच्या दोन भावांनी दोन वेगवेगळे प्रांत वाटून घेतल्याची माहिती आश्चर्यकारक होती. लक्ष्मणतात्यांच्या कल्पकतेला दाद देत टीम शिरगाव घाटातून फलटणकडं रवाना झाली.‘पुरंदर किल्ल्यावर कसा ‘विजय’ मिळविता येईल?’ याचा विचार करत रामराजे त्याच दिशेनं दुर्बिण लावून बसलेले. साताऱ्याच्या अधिकाऱ्यांना दरडाविण्यात शिवतारेबापू आपल्याहीपेक्षा वरचढ निघाले, हा सल त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता; परंतु धनुष्यवाल्यांच्या घोळक्यातले नवे चेहरे पाहून ते मिस्किलपणे हसूही लागलेले. आजूबाजूचे काही चमको कार्यकर्ते एकदिवस या नव्या नेत्याला कुठंतरी तोंडघशी पडणार, हेही राजे ओळखून चुकलेले. टीमनं ‘दीवार’ पिक्चरबद्दल विचारलं. मात्र, त्यांना वाटलं की ते शूटिंगसाठी राजवाड्याच्या भाड्याबद्दल विचारताहेत. त्यांनी टीमला थेट ‘‘पिंटूबाबां’कडं पाठविलं; पण ते ‘पालिकेला अनुरूप खुर्ची’ कायमस्वरूपी बंगल्यात घेऊन जाता येते का, यात व्यस्त झालेले. (याठिकाणी वाचकांनी अनुरूप शब्द नीट वाचावा. ‘रू’ अक्षर वगळल्यास त्याला आम्ही पामर जबाबदार नाही!) पलीकडेच दुसरे बंधू ‘संजूबाबा’ ‘झेडपी अध्यक्ष’ हा शिक्का घेऊन तालुक्याच्या विकासाचा प्लॅन आखत बसलेले.फलटणचे तिन्ही बंधू खूपच बिझी असल्यांचं ओळखून पिक्चरची टीम बुधमार्गे पुसेगावकडं निघाली. बोथे डोंगराजवळ अनेक आडदांड माणसं लपून बसलेली. कुणा-कुणाच्या हातात सुरूंगही होते. हे पाहून टीममधला एक स्पॉटबॉय ओरडला, ‘देखो डायरेक्टर साब... क्लायमेक्स में फायटिंग के लिये ये लोग हमारे बहोत काम आयेंगे .’ तेव्हा ‘फायटिंग’वाल्यानं त्याला दाबलं, ‘चूप बैठ बच्चे... उनके ‘गोरे’ हात में बम नहीं. काले जिलेटीन है. एक भाई उधर बोराटवाडी में मुँह से आवाज निकालता है, तो दूसरा भाई इधर ‘कांडी’से. अब एक ‘अंदर’ है, तो दूसरा ‘बाहर’ है. कुछ समझमें आया?’ माणमधला या दोन भावांची राजकीय जुगलबंदी आठवून डायरेक्टरलाही हसू आलं. निवडणुकीत मोठे बंधू ‘मेरे पास पिताजी है!’ असं म्हणाले होते; तेव्हा छोटे बंधू ‘मेरे पास बहेन है!’ असं जोरात उत्तरले होते म्हणे.टीम कोरेगावात आली. इथं ‘बर्गे गु्रप’चा घोळका नेहमीप्रमाणं कुठलं ना कुठलं तरी फ्लेक्स लावण्यात गुंतलेला. त्यांना इथल्या आमदारांबद्दल विचारलं, तेव्हा या बर्गे मंडळींनी ‘आमदार बंधूच्या कर्तृत्वाची महती’ सांगण्यास सुरुवात केली. टीमनं ओळखलं की इथं थांबण्यात काही अर्थ नाही. ते वाठार-किरोली रस्त्यावरचे खड्डे चुकवत कऱ्हाडात पोचले. तिथं तर एक सोडून सहा बंधू आपापलं साम्राज्य सांभाळण्यात मश्गुल. कुणी कारखाना तर कुणी पालिका. कुणी बँक तर कुणी शिक्षण संस्था. प्रत्येक क्षेत्रात आपलीच ‘पाटीलकी’ मिरविणाऱ्या या नेत्याला लांबूनच रामराम ठोकून टीम पाटणमध्ये शिरली. पण तिथं ‘शंभूराज’ रोज एक जनता दरबार घेण्यात दंग. ‘रविराज’बरोबर त्यांचं मनोमिलन झालं की नाही, याचा शोध टीमनं घेतला; पण दोघांची इच्छा असूनही केवळ ‘इगो’मध्ये ‘बंधूभेट’ बाजूूला राहिल्याची कुजबूज कानी पडली.अखेर कंटाळून ही ‘पिक्चरवाली टीम’ सातारा शहरात शिरली. ‘सुरूची’चं नवं बांधकाम मोठ्या कौतुकानं पाहणाऱ्या बाबाराजेंना त्यांनी ‘दीवार’च्या स्टोरीबद्दल विचारलं. त्यांना स्टोरी आवडली. वहिनींशीही त्यांनी चर्चा केली. अखेर ते या पिक्चरसाठी तयार झाल्याचं कळताच खूष होऊन टीमनं समोरचं ‘जलमंदिर’ गाठलं. मोठ्या राजेंनीही मातोश्रींसोबत चर्चा केली. त्यांनीसुद्धा होकार दिला. तेव्हा ‘ट्रायल’ म्हणून या दोघांना पालिकेच्या आवारात समोरासमोर आणलं गेलं. कॅमेरासमोर एन्ट्री करत बाबाराजेंनी डॉयलॉग मारला, ‘मेरे पास कारखाना है. सूतमिल है. मार्केट समिति है.. तुम्हारे पास क्या है?’ मोठ्या राजेंनीही नेहमीच्या स्टाईलनं बोट फिरवत उत्तर दिलं, ‘मेरे पास तुम्हारे संस्थाओं के पीछे भुंगा लगानेवाले कई कार्यकर्र्ता है!’ हे ऐकताच डायरेक्टर पुरता घाबरला. त्यानं तत्काळ ‘पॅकअप’ची आॅर्डर दिली. टीमनंही थेट मुंबईकडं सुंबाल्या केला. पुन्हा कधीही साताऱ्यात न येण्याची शपथ घेत!!सचिन जवळकोटे
आमदार बंधूंचा ‘दीवार’
By admin | Updated: January 14, 2015 23:51 IST