लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या सहकारी संस्थांच्या आगामी निवडणुकांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘फोकस’ केलेला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी व किसन वीर व कृष्णा सहकारी साखर कारखाना या दोन्ही मोठ्या संस्था विरोधकांकडून खेचून ताब्यात घेण्यासाठी पवारांनी रणनीती आखल्याचे चित्र आहे.
राज्याची सत्ता ही राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू आहे. या सत्तेमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलेले आहे. राज्यात सत्ता नसतानाही जिल्हा बँकेवर एकहाती सत्ता कायम ठेवण्यात राष्ट्रवादीला यश आले होते. आता किसन वीर सहकारी साखर कारखाना आणि कृष्णा सहकारी साखर कारखाना या दोन मोठ्या संस्था भाजपच्या ताब्यातून खेचून घेण्यासाठी राष्ट्रवादीने रणनीती आखलेली आहे.
जिल्हा बँकेवर असलेली पकड कायम ठेवण्याच्या योजना पूर्ण झाल्या असून, निवडणुकीत त्याचे परिणाम निश्चितपणे दिसणार आहे. मात्र, यासोबतच कृष्णा कारखाना आणि किसन वीर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ताकद लावायला लागणार आहे. शेतकऱ्याचे ऊसबिल थकल्याने किसन वीरच्या सभासदांमध्ये मोठी नाराजी आहे. हीच नाराजी मतांमध्ये रूपांतरित करायची राष्ट्रवादीने तयारी सुरू केलेली असून, आमदार मकरंद पाटील यांनी पवारांशी याबाबत चर्चादेखील केलेली आहे.
कृष्णा कारखान्यातही उंडाळकरांना सोबत घेऊन अविनाश मोहिते यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने मैदान मारण्याचा निर्णय घेतलेला आहे. अॅड. उदयसिंह उंडाळकरांना जिल्हा बँकेवर घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असून, त्याबदल्यात उदयसिंहांनी राष्ट्रवादीला कृष्णाच्या निवडणुकीत जाहीरपणे मदत करायचा तह झाल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. उंडाळकरांनी काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यामुळे या चर्चेला आणखीनच ऊत आला आहे. एकूणच राष्ट्रवादीने सहकारी निवडणुकांचे मिशन हाती घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
चौकट..
शेतकऱ्यांची नाराजी परवडणार नाही...
जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी तब्बल सहा तालुक्यांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या किसन वीर सहकारी साखर कारखान्याची अवस्था दयनीय झाली आहे. ऊस घातलेल्या कारखान्यांना वेळेत उसाची बिले मिळत नसल्याने या कायक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपला ऊस गेटकेनने दुसऱ्या काखान्यांना घातलेला आहे. शेतकऱ्यांच्या मालकीचा अन् हक्काचा कारखाना जवळ असतानादेखील शेतकरी गेटकेनने दुसऱ्या कारखान्यांकडे गेले, तिथेही शेतकऱ्यांना नाडवले जातेय. या परिस्थितीमध्ये ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहे. ही नाराजी कोणत्याही लोकप्रतिनिधींना परडवणारी नाही.
चौकट..
किसन वीर कारखान्यात आमदार गटाचे लक्ष
किसन वीर सहकारी साखर कारखान्याची मागील निवडणूक आमदार मकरंद पाटील व त्यांच्या गटाने लढवली नसल्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी भुवया उंचावल्या होत्या. कारखाना एकाकडे, तर आमदारकी एकाकडे, असे नेत्यांचे ठरल्याची कुजबूज गेल्या पाच वर्षांपासून वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यात सुरू आहे. मात्र, निवडणूक लढली असती, तर कारखान्याचा तोटा अधिक वाढला असता, तसेच कारखान्यावरील कर्जाच्या बोजामुळे तो सांभाळणेदेखील शक्य झाले नसते, असे कारण आमदार गटाकडून सांगितले जाते. आता मात्र आमदारांनी चांगलेच मनावर घेतलेय. कारखान्याची निवडणूक आमदार मकरंद पाटील निश्चितपणे लढतील, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
चौकट...
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत अविनाश मोहितेंना बळ
सातारा, सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे धूमशान सुरू झाले आहे. राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस अविनाश मोहिते यांच्या ताब्यातील कारखाना डॉ. सुरेश भोसले यांनी खेचून घेतला होता. आता हा कारखाना पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने अविनाश मोहिते यांना बळ दिलेले आहे. मागील निवडणुकीमध्ये उंडाळकर गटाने भोसले गटाला पाठबळ दिले होते. मात्र भोसलेंचा गट लोकसभा व विधानसभेला भाजपसोबत गेल्याने उंडाळकरांनी त्यांची साथ सोडली. कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, डॉ. अतुल भोसले, अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यात टक्कर होऊन पृथ्वीराज चव्हाण दुसऱ्यांदा निवडून आले. आता राष्ट्रवादी उंडाळकरांच्या मदतीने कृष्णात झेंडा फडकवण्याच्या इराद्यात आहे.
चौकट...
जिल्हा बँकेवर उंडाळकरांची लागणार वर्णी
कऱ्हाड दक्षिण व कऱ्हाड उत्तर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील सहकारी संस्थांमध्ये दिवंगत आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचा दबदबा होता. त्यांच्या निधनामुळे काहीअंशी उंडाळकर गटाची ताकद कऱ्हाड उत्तरमध्ये क्षीण झालेली आहे. मात्र उंडाळकरांचे कार्यकर्ते अजूनही दोन्ही मतदारसंघांमध्ये कार्यरत आहेत. आता काँग्रेसने गट-तट विसरुन एकत्र येण्याचा निर्णय घेतला. विलासकाकांच्या हयातीतच पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाकांचे हाडवैर शमले. दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन काँग्रेसला बळकट करण्याचा निर्धार घेतला. दरम्यानच्या काळात विलासकाकांचे निधन झाले. मात्र, त्यांचे चिरंजीव अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे गट-तट विसरुन काँग्रेसच्या प्रवाहात कार्यरत झालेले आहेत. आता उदयसिंहांना जिल्हा बँकेवर बिनविरोध घेऊन त्याबदल्यात त्यांची ताकद कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अविनाश मोहितेंना देऊ शकते, तशा राजकीय हालचालीही सुरू आहेत.