सातारा : सातारा शहरातून लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये मनोमिलनाविरोधात नकारात्मक मतदान झाले. त्याबाबत आत्मपरीक्षण करुन भविष्यातील आडाखे ठरविण्यासाठी सातारा विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक येत्या मंगळवारी (दि.११) साताऱ्यात बोलविण्यात आली आहे. या बैठकीबाबत जलमंदिरमधून संबंधित नगरसेवकांना निरोप धाडण्यात आले आहेत.सकाळी ११ वाजता एका हॉटेलमध्ये ही बैठक बोलाविण्यात आली आहे. याबाबतचे निरोप गुरुवारी रात्री उशिरा आघाडीचे नगरसेवक, नगरसेविकांपर्यंत पोहचविण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत ‘आप’चे उमेदवार राजेंद्र चोरगे यांना शहरातून बऱ्यापैकी मतदान झाले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘मनोमिलन’ अभेद्य असताना सातारा शहराने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात नकारात्मक मतदान करून फटका दिला. विधानभा निवडणूक निकालानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. त्यातून त्यांचा रोष सातारा विकास आघाडीच्या आजी-माजी नगरसेवकांवर असल्याचे सूचित झाले होते. नंतर आमदार भोसले यांनी आपले वक्तव्य मागे घेत कोणाबद्दलही मनात कटुता नसल्याचे स्पष्ट केले होते. हे प्रकरण संपले, असे वाटत असले तरी आतून मोठी खदखद आहे. या बैठकीनंतर निवडणुकीत न्यूट्रल राहून ‘मजा’ करणाऱ्यांना फैलावर घेण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीचे धोरणही ठरणार आहे. या बैठकीत नेते काय भूमिका घेणार, याविषयी राजकीय गोटात उत्कंठा लागली आहे. (प्रतिनिधी)कोण कुठे कमी पडले?शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधातील उमेदवारांना वाढलेल्या मतदानाच्या मुळाशी जाण्याची भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे. पालिकेत सत्ता असतानाही शहरातच कमी मतदान होण्यामागची कारणे शोधण्यात येत आहेत. या बैठकीत शहरातील मतदान केंद्रनिहाय आमदार भोसले व विरोधी उमेदवारांना पडलेली मते याचा लेखाजोखा मांडला जाईल. त्या मतदान केंद्राची जबाबदारी कोणत्या कार्यकर्त्यांवर होती, हे कार्यकर्ते कोठे व का कमी पडले, याची चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
‘साविआ’च्या नगरसेवकांना जलमंदिरमधून निरोप
By admin | Updated: November 7, 2014 23:40 IST