चाफळ : ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत चाफळ येथील फरशी पुलाचे साहित्य संबंधित कामाच्या ठेकेदाराने चक्क भंगारात विकले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारावर कारवाई करून साहित्याच्या पैशाची शासनाने वसुली करून ग्रामपंचायतीस द्यावी, अशी मागणी चाफळ ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे.
चाफळ गावात जाण्यासाठी उत्तरमांड नदीवर लहान फरशी पूल होता. अरुंद व कमी उंचीमुळे हा पूल पावसाळ्यात सतत पाण्याखाली जात होता. पुलाची दुरवस्था झाल्याने लहान-मोठे अपघात होऊन अनेकजण जखमी होत होते. याची दखल घेत शासनाने याठिकाणी नवीन फरशीपूल बांधकामासाठी एक कोटीचा निधी मंजूर केला आहे. सध्या या पुलाचे काम सुरू आहे. मुळातच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या पुलाचे काम सुरू असताना ग्रामस्थांना ये-जा करण्यास ठेकेदाराने पर्यायी व्यवस्था केली नव्हती. जिथून पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती, त्याठिकाणच्या पाईप वाहून गेल्यानंतर दुसरी पर्यायी व्यवस्था करण्याकडे ठेकेदाराने टाळाटाळ केली होती. त्यामुळे ब्रिटिशकालीन पुलावरून ग्रामस्थ ये-जा करू लागले होते व येथे ग्रामस्थ पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. तरीही बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार गप्पच होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शेवटी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने हा विषय उचलून धरल्यावर मग ठेकेदाराने पर्यायी व्यवस्था केली.
सध्या चाफळ गावाला जोडण्यासाठी उत्तरमांड नदीवर नवीन फरशी पूल बांधण्यात येत आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असले, तरी भंगारात साहित्य विकल्याच्या प्रकाराने पुन्हा तो चर्चेचा विषय ठरला आहे. येथे नवीन फरशी पुलाच्या जागी जुना फरशी पूल होता. नवीन काम करत असताना संबंधित ठेकेदाराने जुन्या पुलाचे लोखंडी साहित्य संबंधित ग्रामपंचायत अथवा बांधकाम विभागाच्या ताब्यात देणे गरजेचे होते. मात्र, ठेकेदाराने कोणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार राबवत स्वत:च जुन्या पुलाचे साहित्य थेट भंगारात विकले. याची कबुली स्वत: ठेकेदाराने दिल्याने प्रशासन या ठेकेदारावर काय कारवाई करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोट...
चाफळ येथील जुन्या पुलाचे साहित्य काढल्यानंतर ते आम्हीच स्वत: विकले आहे. बांधकाम विभाग जो दंड भरण्यास सांगेल तो आम्ही भरणार आहे.
- देवानंद चव्हाण, ठेकेदार
कोट...
चाफळ येथे बांधण्यात येत असलेल्या नवीन फरशी पुलाचे बांधकाम करत असताना संबंधित ठेकेदाराने यापूर्वीच्याही सरपंचांना कधी विश्वासात घेतले नव्हते. जुन्या पुलाचे लोखंडी साहित्य परस्पर भंगारात नेऊन विकले आहे. मुळातच जुने साहित्य ग्रामपंचायत अथवा बांधकाम विभागाच्या ताब्यात देणे गरजेचे होते. त्यावेळी विचारणा केली असता, या जुन्या साहित्यावर आमचाच हक्क असल्याचे ठेकेदार सांगत होता. याबाबत चौकशी केली असता, त्या ठेकेदारास फक्त बांधकामाचा परवाना दिल्याचे सांगण्यात आले. म्हणून सध्या ग्रामसभेत ठराव घेऊन साहित्य विकल्याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
- आशिष पवार, सरपंच, चाफळ