कऱ्हाड : वाठार (ता. कऱ्हाड) येथील कृष्णा फाउंडेशन या शैक्षणिक संकुलात ‘मनस्विनी २०२१’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खानापूरच्या मुख्याधिकारी व कृष्णा फाउंडेशनच्या माजी विद्यार्थिनी अश्विनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आयुष्यात स्वत:ला सिद्ध करायचे असेल तर मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. ती पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत, असे मत अश्विनी पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. वैष्णवी पवार हिने प्रास्ताविक केले. अनिता कुंभार यांनी आभार मानले. यावेळी अध्यापक कर्मचारी, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.
पाण्यासाठी सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा
कऱ्हाड : महाड येथे २० मार्च १९२७ रोजी चवदार तळे या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला होता. या आठवणींना उजाळा देत कऱ्हाड शहरात पाणीवाटप करण्यात आले. विविध सामाजिक संघटनांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. भीमशौर्य चॅरिटेबल ट्रस्ट व पंचशील सामाजिक विकास संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी स्वप्निल थोरवडे, ओंकार थोरवडे, संदीप बनसोडे, भारत थोरवडे, नितीन ढेकळे, मयूर थोरवडे, प्रशांत लादे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ढेबेवाडी फाटा परिसरात सुशोभीकरण गरजेचे
मलकापूर : येथील पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत ढेबेवाडी फाट्यावर उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण केले आहे. मात्र कोरोनाकाळात सुशोभीकरणाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने तेथील झाडे गायब झाली आहेत. अज्ञातांनी काही रोपे उपटून टाकली आहेत. तर कुंड्यांचीही मोडतोड केली आहे. स्वच्छ सर्व्हेक्षणअंतर्गत करण्यात आलेल्या या सुशोभीकरणामुळे ढेबेवाडी फाट्यावरील सौंदर्य खुलले होते. सध्या येथील काही झाडे गायब असल्याने त्या परिसराची दुरवस्था झाली आहे. पालिकेने पुन्हा एकदा त्याकडे लक्ष देऊन रोपांची लागवड करण्याची गरज आहे. सध्या हा परिसर बकाल झाल्याचे दिसून येत आहे.
उरुल घाटात कचरा टाकल्यामुळे दुर्गंधी
मल्हारपेठ : उंब्रज ते मल्हारपेठ रस्त्यावरील उरुल घाटात दुर्गंधी वाढली आहे. मृत जनावरे व कचरा टाकण्याचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना अक्षरश: नाक धरून घाटाचा परिसर चालावा लागत आहे. या घाटात कायमच सुविधांची वानवा असते. त्यात नेहमीच समस्यांची भर पडत असून, घाटातील एका वळणावर मृत जनावरे टाकली जात असल्याने त्या ठिकाणी मोकाट श्वानांचा वावरही वाढला आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांवर हे श्वान हल्ला करीत आहेत. त्यामुळे घाटात जाण्यास परिसरातील ग्रामस्थ धजावत नाहीत. या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर ग्रामपंचायतीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कऱ्हाडला वाढीव भागांत फवारणीची मागणी
कऱ्हाड : शहरातील वाढीव हद्दवाढ भागातील अनेक गटारांची सफाई पालिकेने केलेली नाही. ती साफसफाई तातडीने करावी, अशी मागणी होत आहे. शहरात संसर्गजन्य आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधक फवारणीची गरज आहे. त्यासाठी पालिकेने कार्वे नाक्यापासून पूर्व व पश्चिम भागांतील सर्व भागांमध्ये फवारणी करणे गरजेचे आहे. फवारणीचे वेळापत्रक आखून पालिकेने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.