सातारा : ''कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील सर्वच सरपंचांनी अहोरात्र काम केले. मात्र, काही दिवसांपासून सर्व क्षेत्र खुले झाल्यानंतर नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यामुळे आता कोरोनाला अटकाव घालण्याची जबाबदारी ग्राम कृतीचे अध्यक्ष म्हणून सरपंचांवर आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा प्रभावीपणे काम करावे,'' असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी केले.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ग्रामस्तरीय कृती समितीचे अध्यक्ष तथा सरपंच, ग्रामसेवक यांची ऑनलाईन कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत फडतरे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी शेखर सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील तसेच जिल्ह्यातील सातशेहून अधिक सरपंच सहभागी झाले होते.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे म्हणाले, ''कोरोनाला रोखण्यासाठी समितीने कठोर निर्णय घेणे आवश्यक असून, मास्कचा वापर न करणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली पाहिजे. दुकाने, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. विविध माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणे आवश्यक आहे. ग्राम कृती समित्यांनी वारंवार बैठका घेऊन प्रशासनाकडून आलेल्या सूचनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी.
जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनीही सरपंचांना मार्गदर्शन केले. बहुतांश ग्रामपंचयातींच्या निवडी काही महिन्यांपूर्वी झाल्यामुळे तेथे सरपंच नवनियुक्त आहेत. त्यामुळे त्यांना जोमाने काम करावे लागणार आहे. विशेषत: मास्कचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, साबणाने वारंवार हात धुणे या सवयी कटाक्षाने पाळल्या जातील, यासाठी सरपंचांनी गावांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन केले. आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावेत, तसेच फ्रंटलाईनमध्ये सरपंच काम करत असल्याने त्यांनाही प्राधान्याने लस देण्याचा मुद्दा शासन स्तरावर मांडणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा म्हणाले, ४५ ते ५९ या वयोगटातील कोमॉर्बिड नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करणे जमणार नाही. त्यांनी आपली नोंदणी ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये करावी. यासाठी सरपंच आणि ग्रामसेवकांनी पुढाकार घ्यावा. गावात कोणी कोरोनाबाधित आढळला तर त्यांच्या सपंर्कातील किमान २० व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून घ्यावे. संशयितांचे विलगीकरण करावे आणि त्यांच्यावर ग्राम कृती समितीने नियंत्रण ठेवावे.
दरम्यान, सहभागी सरपंचांनी उपस्थित केलेल्या शंका आणि प्रश्नांना अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी उत्तरे दिली.
फोटो २२सातारा झेडपी नावाने...
फोटो ओळी : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यशाळेत सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मार्गदर्शन केले.
.........................................................................