दहिवडी : आपली कुवत व उंची नसलेल्यांनी ती उंची गाठण्याची केविलवाणी धडपड करणाऱ्या बोराटवाडीकराला सैराट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या वयातही कोणत्याही पैलवानाला चितपट करण्याची ताकद माझ्यात आहे, असा विश्वास रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.विधान परिषदेच्या सदस्यपदी रामराजे नाईक-निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल दहिवडी येथील खरेदी-विक्री संघात आयोजित सत्कार समारंभात रामराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष नरळे, अनिल देसाई, माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉ. संदीप पोळ, माजी सभापती श्रीराम पाटील, माण बाजार समितीचे उपसभापती दादासाहेब जाधव, पंचायत समिती सदस्य वसंतराव जगताप, सातारा जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे, मनोज पोळ आदी उपस्थित होते.‘माण हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता व आहे. परंतु बालेकिल्ल्याच्या भिंतीला काही उंदरांनी बिळं पाडली होती. ती मुजवण्याची गरज आहे. राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तालुक्यात सुरू असलेल्या बोराटवाडीच्या दहशतीच्या राजकारणाला हाणून पाडावे. कारण हा दहशतवाद जिल्हाभर पसरतोय. तेव्हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश मिळवून माण तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून द्यावे,’ असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. रामराजे म्हणाले, ‘स्वत:च्या मर्यादा, योग्यता, उंची याचा विचार न करता बोलणाऱ्यांना मी योग्यवेळी उत्तर देईन अजून ती वेळ नाही. माणला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून गृहीत धरलं जात होतं. तात्यांच्या निवडणुकीत तुमची ताकद कमी पडली. बालेकिल्ला ढासळलेला नाही; पण किल्ल्याच्या भिंतीला काही उंदरांनी पाडलेली बिळं मुजवायची गरज आहे. सध्या पक्षाच्या अस्तित्वाबरोबरच नेते व कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. तुमच्या इथल्या शत्रूचा दहशतवाद जिल्हाभर पसरू लागला आहे ही धोक्याची घंटा आहे. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत घरेदारे उद्ध्वस्त करण्याची भाषा सुरू आहे. यापूर्वी विरोधक होते पण आता हिंसक वळण व गुन्हेगारी वाढीस लागली आहे.’ यावेळी डॉ. संदीप पोळ, अनिल देसाई, सुभाष नरळे, प्रा. कविता म्हेत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बाळासाहेब मदने यांनी प्रास्ताविक केले. अमोल काटकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)माणशी पिढ्यान्पिढ्या घराण्याचे संबंध ‘माण मतदारसंघात काडीचीही राजकीय इच्छा नाही. आमचे माणशी पिढ्यान्पिढ्यांचे संबंध असल्यामुळे व तुमच्या आग्रहाखातर मी इकडे येतो. मी घाटावर येण्यापेक्षा काहींना सांगलीला जाणाऱ्या घाटाने पाठवणे योग्य ठरेल. आत्ताच्या निवडणुका पाहता घरी बसणं किंवा खोट्या नोटा छापणं हे दोनच पर्याय तुमच्यासमोर आहेत. पुढारी कुठेही उधळले तरी कार्यकर्त्यांनी उधळू नका मी तुमच्यासोबत आहे.’ असेही यावेळी रामराजे म्हणाले.
गोरेंना सैराट बनवू : रामराजे
By admin | Updated: June 7, 2016 07:34 IST