लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘सामाजिक बांधीलकी जपून आपले कर्तव्य पार पाडण्याचा रक्तदान हा एक श्रेष्ठ मार्ग आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करायला हवे,’ असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी गुरुवारी केले. दरम्यान, पहिल्या दिवशी ४३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहातील रक्तदान शिबिराच्या उद्घाटनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने रक्तदान करण्याबाबत आवाहन केले आहे. याअंतर्गत सातारा जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ यांच्या मार्गदर्शनानुसार हे शिबिर होत आहे. दोन दिवस शिबिर चालणार आहे.
कोणत्याही आपत्तीवर मात करण्यासाठी समाजाने एकत्र येणे गरजेचे असते. रक्तदानामुळे जीवनदान मिळते. रक्तदान हा त्यासाठीचा उत्कृष्ट मार्ग आहे, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी सांगितले. दरम्यान, या रक्तदान शिबिराचे नियोजन सामान्य प्रशासन विभागाने केले आहे.
फोटो दि.२८सातारा झेडपी नावाने... (फोटो घेणे)
फोटो ओळ : सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\