महाबळेश्वर : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पालिकेच्यावतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह, आमदार मकरंद पाटील यांच्यासह प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांना ‘माझी वसुंधरा मित्र’ प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, उपनगराध्यक्ष अफझल सुतार उपस्थित होते.
पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांसोबत मानवी जीवन पद्धती अंगीकारण्याची सवय लागावी यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने राज्यात ‘माझी वसुंधरा’ हे अभियान सुरू केले आहे. महाबळेश्वर पालिकाही या अभियानात सक्रियपणे सहभागी झाली आहे. नूतन वर्षाच्या प्रारंभी येथील रांजणवाडी भागात ‘माझी वसुंधरा शपथ’ घेऊन या अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. जांभूळ, उंबर, डाका, सोनचाफा या प्रजातीच्या सुमारे साडेआठशेहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली होती. नुकतीच महाबळेश्वर बाजारपेठ सुशोभिकरण आराखडा सादरीकरणासंदर्भातील व्यापारी व्यावसायिकांची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीची सुरुवात उपस्थितांना ‘माझी वसुंधरा’ शपथ देऊन करण्यात आली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या हस्ते तर आमदार मकरंद पाटील यांचा नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्या हस्ते ‘माझी वसुंधरा मित्र’ प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांचा देखील ‘माझी वसुंधरा मित्र’ प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष अफझल सुतार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, जिल्हा बँक संचालक राजूशेठ राजपुरे, पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी उपस्थित होते.