महाबळेश्वर : पर्यटकांचे लाडके ‘डेस्टिनेशन’ असलेल्या महाबळेश्वरच्या केट्स पॉइंटवरून धोम-बलकवडीपर्यंत पर्यटकांसाठी ‘रोप-वे’ तयार करण्याचा प्रस्ताव विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने तयार केला असून, त्यामध्ये दुरुस्त्या करून शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. केट्स पॉइंटजवळ ‘रॉक क्लाइंबिंग’ची सुविधाही उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाबळेश्वरच्या दौर्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी सकाळी अकरा वाजता केट्स पॉइंट व इतर पॉइंट्सची पाहणी केली. राज्य व केंद्र सरकारकडून पॉइंट्सच्या दुरुस्ती कामांसाठी मोठा निधी मिळाला असून, या कामांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. नगरपालिकेला सर्वाधिक उत्पन्न देणार्या बोट क्लबच्या जागेत सुधारणा करण्याबाबत पालिकेने केलेल्या आराखड्याची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. त्या ठिकाणी पर्यटकांसाठी बसण्याची सुविधा, वाहनतळ, घोडसवारी यासाठी येणारा खर्च आठ कोटी रुपये आहे. याबाबतचा योग्य प्रस्ताव जिल्हाधिकार्यांमार्फत पाठविण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली. ग्रामीण रुग्णालयाविषयी पत्रकारांशी चर्चा करताना ते म्हणाले, ‘रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती करणे व त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा पुरविणे आवश्यक आहे. इमारत जुनी झाली असून, ती तशीच ठेवून जुन्या पद्धतीनेच नवी इमारत बांधण्यात यावी. डॉक्टरांचे निवासस्थान, सहा खाटांचा अतिदक्षता विभाग, डॉक्टर व नर्सेसची नव्याने नेमणूक आदी बाबींचा प्रस्ताव पाठविण्यात यावा.’ (प्रतिनिधी)
महाबळेश्वर ते धोम-बलकवडी ‘रोप-वे’
By admin | Updated: May 11, 2014 23:57 IST