‘थांबला तो संपला’ असे म्हटले जाते. पण, कधी सुरुवात करायची आणि कुठे थांबायचं हे सुद्धा कळणं तितकच महत्त्वाचं असतं. राजकारणात तर कुठे थांबावे हे कळणं अतिशय महत्त्वाचे असते. पण अनेकदा लोकांनी थांबवले तरी काहींना थांबायचं कळत नाही. असो .. कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांनी मात्र योग्य वेळी निवडणुकीतून थांबण्याचा निर्णय घेतला आहे. तो इतरांनाही नक्कीच अनुकरणीय ठरू शकतो.
१९८९ साली कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले या दोन सख्ख्या भावांत संघर्ष उभा ठाकला. यशवंतराव मोहिते यांनी आपल्या रयत पॅनलचा उमेदवार म्हणून मदनराव मोहिते यांचे नाव पुढे आणले. आणि शेतीत रमणारे मदनराव कृष्णाच्या राजकीय पटलावर अवतरले.
कारखान्याच्या निवडणुकीत ऐतिहासिक सत्तांतर झाले. यशवंतराव मोहिते यांचे रयत पॅनल विजयी झाले. मदनराव यांना अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. ते कारखान्याचे सलग दहा वर्षे अध्यक्ष राहिले. मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले. कारखान्याच्या इतिहासात ऊस उत्पादकांना उच्चांकी दर देणारा अध्यक्ष अशी त्यांची ख्याती निर्माण झाली. अर्थात या सगळ्यात त्यांना ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांचे मिळालेले मार्गदर्शन नजरेआड करता येणार नाही.
सभासदांनी मदनराव मोहिते यांचा सुवर्णकाळ अनुभवल्यानंतरही १९९९ साली कारखान्यात पुन्हा सत्तांतर केले. मात्र, मदनराव मोहिते यांनी सभासदांचा संपर्क कायम ठेवला. २००४ च्या निवडणुकीत डॉ. पतंगराव कदम व मदनराव मोहिते यांनी कृष्णा काठचे वातावरण ढवळून काढले. सत्ता खेचून आणली. या दोघांनी यशवंतराव मोहिते यांना गुरुदक्षिणा दिली. डॉ. इंद्रजित मोहिते यांना कारखान्याचे अध्यक्ष बनविले.
दरम्यानच्या, काळात डॉ. पतंगराव कदम यांच्या पुढाकारातून मोहिते-भोसले यांचे मनोमीलन झाले. हे मनोमीलन कारखान्याच्या निवडणुकीला सामोरे गेले. पण नवख्या असणाऱ्या अविनाश मोहिते यांनी सत्तांतराचा ‘नारळ’ फोडला. त्यानंतर मनोमिलन बिघडले. २०१५ ला तिरंगी लढत झाली. डॉ. सुरेश भोसले यांचे पॅनल विजयी झाले. हा सगळा प्रपंच एवढ्यासाठीच की, या प्रत्येक निवडणुकीत मदनराव मोहिते सक्रिय सहभागी होते. प्रत्यक्ष त्यांची उमेदवारी होती. यंदा मात्र होत असलेल्या निवडणुकीत ते पहिल्यांदाच रिंगणात दिसत नाहीत.
होऊ घातलेल्या निवडणुकीत त्यांची भूमिका काय राहणार? याबाबत उलटसुलट चर्चा होत्या. पण या निवडणुकीत मदनरावांनी मार्गदर्शकाची भूमिका घेतली आहे. फक्त ते सहकार पॅनलचे मार्गदर्शक आहेत एवढंच ! काही दिवसापूर्वी सहकार पॅनलच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी बोलताना मदनराव मोहिते म्हणाले, मी कुठे आहे याबद्दल अफवा पसरवल्या जातील. त्यावर विश्वास ठेवू नका. मी सहकार पॅनलबरोबर डॉ. सुरेश भोसले यांच्या जोडीला आहे. शिवाय मला आयुष्यात खूप काही मिळाले आहे. दहा वर्ष कारखाना अध्यक्षपदाची संधी मिळाली. तर मी पॅनल निवडून आणून एकाला अध्यक्ष केले. त्यामुळे मी आयुष्यात समाधानी आहे. असं सांगतानाच निवडणुकीपासून आपण निवृत्ती घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी देखील स्वतः खासदार असतानाच राजकीय निवृत्ती घेत रेठरे येथे येऊन राहणे पसंत केले होते. अशी समाधानी वृत्ती प्रत्येक राजकारण्यांनी दाखवली तर.. तर निश्चितच नव्या पिढीला राजकारणात संधी मिळेल यात शंका नाही.
प्रमोद सुकरे, कऱ्हाड