कराड :
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक मे महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांचेसह विरोधी दोन माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते व अविनाश मोहिते यांनी गत दोन महिन्यापासूनच प्रचार सुरू केला आहे. मात्र यात माजी अध्यक्ष मदनराव मोहिते सक्रिय दिसत नव्हते. त्यांच्या भूमिकेविषयी सभासदांच्यात उत्सुकता होती. पण ती आता संपली आहे. मंगळवारी शेणोली येथील जाहीर सभेत मदनराव मोहिते यांनी डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा कारखाना सुरक्षित आहे. त्यांच्या पाठीशी रहा असे आवाहन केल्याने त्यांची भूमिका आता स्पष्ट झाली आहे.
सातारा व सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत गतवर्षीच संपली आहे. मे- जून महिन्यातच कारखाना निवडणूक अपेक्षित होती. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्याला मुदतवाढ देण्यात आली .त्यामुळे सत्ताधाऱ्यांना एकप्रकारे लॉटरीच लागली .आता मात्र कृष्णा कारखाना निवडणूक पूर्व प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नजीकच्या काही दिवसात कच्ची मतदार यादी प्रसिद्ध होऊन मे महिन्यात प्रत्यक्ष मतदान होईल असे जाणकार सांगत आहेत.
दरम्यान सहकार पॅनलचे प्रमुख, विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले ,कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, रयत पॅनलचे प्रमुख माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, संस्थापक पॅनलचे प्रमुख माजी अध्यक्ष अविनाश मोहिते या सर्वांनी गत दोन महिन्यापासून प्रचारावर भर दिला आहे. सभासदांच्या गाठीभेटी, घरगुती बैठका करून आपली भूमिका प्रत्येक जण मांडत आहे. या साऱ्यात ज्येष्ठ नेते, कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते मात्र कोठे दिसत नव्हते. त्यामुळे सभासदांच्यात त्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता होतीच !
मंगळवारी शेणोली( ता. कऱ्हाड )येथे सहकार पॅनलच्या प्रचारार्थ सभासदांची एक बैठक झाली. त्या बैठकीला विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या बरोबरीने माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती .त्यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी बोलताना मदनराव मोहिते यांनी डॉ. सुरेश भोसले यांनी गत पाच वर्षात कारखान्याचा कारभार अतिशय चांगला केला आहे. त्यांच्या हातातच कारखाना सुरक्षित आहे. त्यामुळे सभासदांनी त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे असे आवाहन केले. तर विरोधकांच्यावर अप्रत्यक्ष टीकाही केली. त्यामुळे मदनराव मोहिते यांची कृष्णा कारखाना निवडणुकीतील भूमिका आता स्पष्ट झाली आहे.
चौकट:
''लोकमत'' ने प्रसिद्ध केले होते वृत्त ...
''मदनराव मोहिते यांच्या निवडणूक भूमिकेबाबत सर्वांना उत्सुकता'' या मथळ्याखाली लोकमतने ६ मार्च रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते .त्यानंतरही राजकीय वर्तुळात याबाबत बरीच उलटसुलट चर्चा झाली. मात्र मंगळवारी सहकार पॅनलच्या प्रचारात मदनराव मोहिते सक्रिय झाल्याने चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे.
फोटो :
शेणोली (ता.कऱ्हाड) येथे सहकार पॅनलच्या प्रचार कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, यावेळी व्यासपीठावर डाॅ. सुरेश भोसले व इतर उपस्थित होते.