लोणंद नगरपंचायतीत घड्याळाचा गजर !राष्ट्रवादीला आठ जागा : आनंदराव शेळके, बागवान वकील पराभूतलोणंद : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या लोणंद नगरपंचायत निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला सर्वाधिक आठ जागा मिळाल्या असून, त्या पाठोपाठ काँग्रेसला सहा जागा, तर भाजपला दोन जागांवर समाधान मानावे लागले. एक अपक्ष उमेदवार विजयी झाल्याने सत्तेची चावी त्याच्याच हाती राहणार आहे. काँग्रेसचे बाळासाहेब बागवान अन् राष्ट्रवादीचे आनंदराव शेळके या दोन्ही पॅनेलप्रमुखांना मात्र मतदारांनी घरी बसविले.लोणंद नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. याच्या मतमोजणीस सोमवारी सकाळी दहा वाजता खंडाळा येथील किसन वीर सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अस्मिता मोरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आशा राऊत, लोणंद नगरपंचायत प्रशासक तथा तहसीलदार शिवाजीराव तळपे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रारंभ झाला. यावेळी निवडणूक आयोगाचे निरीक्षक राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते. मतमोजणीचे निकाल बाहेर पडत होते, तसा-तसा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचत होता. पहिल्या फेरीत काँग्रेसला तीन, राष्ट्रवादी आणि अपक्ष प्रत्येकी एक जागा मिळाली. दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादीने तीन, काँग्रेसने एक तर भाजपने एक जागा जिंकून खाते उघडले. तिसऱ्या फेरीत काँग्रेसला दोन, राष्ट्रवादीला एक, भाजपला एक असे बलाबल झाले. ‘काँटे की टक्कर’ सुरू असल्याने सर्वांच्या नजरा चौथ्या फेरीकडे लागल्या होत्या. या फेरीत राष्ट्रवादीने तिन्ही ठिकाणी बाजी मारत सत्तेच्या दिशेने आगेकूच केली. (वार्ताहर)- संबंधित बातमी पान दोनवरनेत्यांना धक्काया निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील यांचा तब्बल १३६ मतांनी पराभव झाला, तर काँग्रेसचे नेते अॅड. बाळासाहेब बागवान यांचा अकरा मतांनी पराभव झाला. त्यामुळे दोन्ही काँग्रेसची अवस्था ‘गड आला; पण सिंह गेला’ अशी झाली आहे.अपक्षाचा निर्णय गुलदस्त्यातसत्ता स्थापनेसाठी नऊ सदस्य आवश्यक आहेत. यामध्ये राष्ट्रवादीला आठ, काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी अपक्ष उमेदवार सचिन शेळके यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात दिवसभर चालली होती. दरम्यान, ‘आपण कोणाला पाठिंबा द्यायचा, हे आपण मतदारांशी चर्चा करूनच निर्णय घेणार आहे,’ अशी माहिती सचिन शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पक्षीय बलाबलराष्ट्रवादी- ८काँग्रेस- ६भाजप- २अपक्ष- १एकूण- १७
लोणंद नगरपंचायतीत घड्याळाचा गजर !
By admin | Updated: April 19, 2016 01:01 IST