वाठार स्टेशन : फलटण तालुक्यातील आळजापूर सारख्या खेडेगावात कॉलेजच्या मित्रांनी साकारलेली आधार सामाजिक संस्था आज त्यांच्यातील कलागुणांच्या जोरावर राज्यभर नावारूपास आली आहे. शासनाच्या निरनिराळ्या योजना असो की सामाजिक विषयावरील प्रबोधन. अन्यथा लघुनाटिके, पथनाट्याद्वारे याचे सादरीकरण करून जनजागृती करणे हाच या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. या संस्थेने नुकतेच सिक्कीममध्ये महाराष्ट्राची लोककला सादर करून सिक्किमवासीयांची मने जिंकली. दरम्यान, त्यांच्या या कलागुणाचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी कौतुक करून सत्कारही केला. नेहरु युवा मंडळाच्या वतीने सिक्कीम येथे नुकतीच राष्ट्रीय पातळीवरील शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वतीने आधार सामाजिक संस्थेस प्रतिनिधीत्व मिळाले होते. ५ दिवसीय या शिबिराचे उद्घाटन सातारचे भूमिपुत्र व सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले. सिक्कीमची राजधानी असणाऱ्या गंगटोक येथील प्लजोर या स्टेडियमवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी भारतातील १२ राज्यांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक राज्यांनी आपआपल्या राज्याच्या लोककला सादर केल्या. यामध्ये महाराष्ट्राच्या वतीने आधार सामाजिक संस्थेने बहुरूपी, छ. शिवाजी महाराज, वासुदेव, गोंधळ यासारख्या लोककलांचे सादरीकरण केले. या सादरीकरणाने सिक्कीमवासीयांची मने जिंकली. राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी या लोककला मंचचे स्वागत केले. संस्थेतील युवकांच्यातील कलागुणांची दखल आता चित्रपटातील मान्यवरांनी घेतली आहे. संस्थापक सुनील नलवडे यांना व राजू जाधव या कलाकारास मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. सुनील नलवडे या युवकाने कलेच्या हट्टापायी शासकीय नोकरी सोडली आहे. (वार्ताहर) सिक्कीम येथे महाराष्ट्राची लोकधारा सादर करणारी आधारची टीम.
सातारकरांकडून सिक्कीममध्ये लोकधारा!
By admin | Updated: April 29, 2016 00:23 IST