सातारा : भेटीगाठी, परवानग्या मिळवणं, पाठिंबा मिळवणं, पत्रकं छापणं, बॅनर तयार करणं, पुठ्ठ्याचे फलक बनवणं... आणि बरंच काही. प्रत्येकजण आपापलं काम व्यवस्थित पार पाडण्याच्या खटपटीत गुंतलेला. नव्या वर्षाचं स्वागत करताना चंगळवादाला फाटा देणारा, जबाबदारीचं भान आलेला हा नवतरुण ‘कँडल मार्च’च्या तयारीत गुंतलाय. शेकडो विद्यार्थी या ‘मार्च’साठी येणार आहेत.एकतीस डिसेंबरची संध्याकाळ नशा, चमचमीत भोजन आणि करमणुकीच्या कार्यक्रमांत व्यतीत करण्याऐवजी काहीतरी चांगलं करून ती संस्मरणीय करण्यासाठी दोन विद्यार्थिनींनी मित्र-मैत्रिणींना साद घातली आणि त्यातून दहशतवादविरोधी ‘कँडल मार्च’ची संकल्पना पृष्ठभागावर आली. पेशावरमध्ये १२५ विद्यार्थ्यांचं शिरकाण करणाऱ्या दहशतवाद्यांना आताच रोखलं नाही, तर हीच वेळ आपल्यावर यायला वेळ लागणार नाही, याचं भान आलेले हे विद्यार्थी स्वयंस्फूर्तीनं ‘मार्च’ची तयारी करीत आहेत. विशेष म्हणजे, अभ्यासात व्यत्यय येऊ द्यायचा नाही हा नियम कटाक्षानं पाळून सर्वांनी आधी घरून पाठिंबा मिळवलाय.यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर समाजाच्या सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांना भरभरून पाठिंबा मिळू लागला. तरुणांना आपला ग्रुप या ‘मार्च’मध्ये असलाच पाहिजे, असं वाटू लागलं आणि त्यांनी संपर्क साधला. वडीलधाऱ्या माणसांनी, शिक्षकांनी मुलांकडे कौतुकाने न पाहता सक्रिय सहकार्य करण्याची भूमिका स्वीकारली. ‘ज्योत से ज्योत’ करीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांची संख्या वाढतच गेली. कोणत्याही पक्षाचा, संस्थेचा, संघटनेचा झेंडा खांद्यावर न घेता केवळ ‘विद्यार्थी’ म्हणून ‘विनालेबल’ एकत्र येण्याची ही धडपड अनेकांना भावली. हे वारे केवळ शहरापुरते मर्यादित न राहता बाहेरगावाहूनही अनेकांनी ‘मार्च’साठी येण्याची तयारी चालविली आहे. दि. ३१ ला सायंकाळी तालीम संघ मैदानावरून ‘कँडल मार्च’ सुरू होईल , राजपथावरून मोती चौकात येऊन खालच्या रस्त्याने पोवई नाक्यावर विसर्जित होईल. (प्रतिनिधी)युवावर्ग सक्रियखटाव तालुक्यात सामाजिक कार्य करणाऱ्या काही युवकांनी या ‘कँडल मार्च’साठी वडूज आणि परिसरातून मोठ्या संख्येने येण्याचं नियोजन केलंय. त्यासाठी अविराज जगदाळे आणि त्यांच्या मित्रांनी शाळा-महाविद्यालयांमध्ये फिरून आवाहन केलं. अनेक युवक दुचाकीवरून या ‘मार्च’साठी साताऱ्यात येण्याची तयारी करीत आहेत.आमच्या कॉलेजमधील मुलामुलींचा हा ग्रुप नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असतो. समाजोपयोगी अनेक उपक्रम ही मुलं राबवत असतात. त्यांची संकल्पना मनापासून पटल्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं सहकार्य मी करणार असून, ‘कँडल मार्च’ला उपस्थितही राहणार आहे.- प्रा. शुभांगी कापरे, वायसी कॉलेज, सातारा‘लोकमत’मध्ये बातमी वाचताक्षणी मुलांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय मी घेतला. पक्ष, संस्था, संघटनांचे बंधन न स्वीकारता मुलं धडपड करीत आहेत. उपक्रम आवडला म्हणूनच मी सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.- अॅड. नितीन भोसलेमी कोडोली भागातील संभाजीनगर वसाहतीत राहतो. आमचा मोठा ग्रुप असून, आम्ही किमान ३५ जण या आगळ्या उपक्रमात सहभागी होणार आहोत. - अक्षय तुपे, विद्यार्थी‘मार्च’साठी एकत्र जमायला तालीम संघाच्या मैदानाची परवानगी मिळाली आहे. आमच्याच ग्रुपमध्ये पन्नासहून अधिक मुलं असून, अन्य किमान पन्नास जण आमच्यासोबत या ‘कँडल मार्च’मध्ये सहभागी होणार आहेत. - सूरज चव्हण, विद्यार्थी
उजळणार शेकडो मेणबत्त्या!
By admin | Updated: December 29, 2014 23:39 IST