वडूज : बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवा, अशी मागणी खटाव तालुका बैलगाडी शर्यतप्रेमी संघटनेने केली आहे. यासंदर्भात तहसीलदार किरण जमदाडे यांना लेखी निवेदन दिले.
या निवेदनात दिलेली अधिक माहिती अशी की, शासनाने शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या बैलगाडी शर्यतीवर बंदी आणल्याने शेतकऱ्यांच्या दावणीला बैलांची संख्या कमी झाली आहे. आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे शेतकरी बैलास जपत आहेत. त्यामुळे बैलावर अन्याय, अत्याचार कसा होऊन देईल. निसर्गाच्या विविध अडचणींवर मात करून विरंगुळा म्हणून बैलगाडी शर्यतीत सहभागी होत असतो. बैल हा पाळीव प्राणी आहे. मात्र, त्याचा समावेश वन्यप्राण्यात केल्याने तथाकथित प्राणिमित्रांचे फावले आहे. परिणामी बैलांची कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे. तरी ग्रामीण भागाच्या अर्थचक्राच्या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बैलगाडी शर्यती सुरू व्हाव्यात, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. यावेळी शुभम शिंदे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी युवक व बांधव उपस्थित होते.