सातारा : अवघ्या चार वर्षांच्या मुलीच्या खुनाबद्दल न्यायालयाने वाढे (ता. सातारा) येथील पित्याला गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पोटच्या दोन मुलींना आइस्क्रीममधून विष देऊन त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तथापि, थोरली मुलगी आणि तो स्वत: बचावला होता. दिनेश चंद्रकांत सुतार असे आरोपीचे नाव आहे. दि. २१ जून २०१२ रोजी त्याने वाढे येथील स्वत:च्या शेतात समृद्धी (वय ८) आणि समीक्षा (वय ४) या दोन मुलींना आइस्क्रीममधून विष दिले होते. समीक्षाचा दि. २ जुलै २०१२ रोजी उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता, तर समृद्धी आणि दिनेश बचावले होते. पत्नीबरोबर वारंवार होणाऱ्या वादांमधून दिनेशने हे कृत्य केले होते. या प्रकरणी समीक्षाचा खून, समृद्धीच्या खुनाचा प्रयत्न आणि आत्महत्येचा प्रयत्न असे तीनही गुन्हे शाबीत झाले आणि अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. पी. रघुवंशी यांनी दिनेशला जन्मठेप ठोठावली.दिनेशची पत्नी अनुराधा (वय २७) ही या प्रकरणातील फिर्यादी आहे. दिनेशशी तिचा विवाह २००३ मध्ये झाला होता. तथापि, दारूचे व्यसन असलेला दिनेश चारित्र्याचा संशय घेऊन अनुराधाला वारंवार मारहाण करीत असे. दिनेशच्या डोक्यावर कर्जाचा डोंगरही चढला होता. तो सुतारकाम करीत असे तर अनुराधा खासगी शिकवण्या घेत असे. दोघांत वारंवार वादावादी होत असल्याने घटनेच्या दोन-तीन दिवस आधीच अनुराधा पुण्याला माहेरी गेली होती.दिनेशने आपल्याला वारंवार मारण्याची धमकी दिली होती, असे अनुराधाने फिर्यादीत म्हटले होते. तसेच ‘मुलींना ठार मारून आत्महत्या करेन,’ अशीही धमकी दिनेश वारंवार देत असल्याचे तिने म्हटले होते. त्यामुळे माहेरी गेल्यावर लगेच मुलींचा ताबा आपल्याला मिळावा, यासाठी तिने अर्ज केला होता. मात्र, दोनच दिवसांत दिनेशने दोन्ही मुलींना विष देऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपनिरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी तपास केला होता. न्यायालयात १४ साक्षीदार तपासण्यात आले. अॅड. मिलिंद आर. पवार यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना प्रॉसिक्यूशन स्कॉडचे हवालदार अविनाश पवार, आयुब खान, सुनील सावंत, नंदा झांजुर्णे, वासंती वझे, संदीप साबळे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)समृद्धीची साक्ष ठरली महत्त्वाचीया खून प्रकरणात दिनेशची थोरली मुलगी समृद्धी हिची साक्ष महत्त्वाची ठरली. घटनेच्या वेळी ती अवघ्या आठ वर्षांची होती. घटनेचे सर्व बारकावे तिने न्यायालयात सांगितले. आपल्याला पित्याने ज्या आइस्क्रीममधून विष दिले, त्याचा रंगही तिने सांगितला.
बालिकेच्या खुनी पित्याला जन्मठेप
By admin | Updated: December 11, 2014 23:53 IST