सातारा : ‘विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सर्वांनी एकदिलाने काम करुन सातारा राज्यातील एक अग्रेसर जिल्हा घडविण्यासाठी सहकार्य करावे’, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यानंतर ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस दलाची मानवंदना स्वीकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, सातारच्या नगराध्यक्ष माधवी कदम, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे जीवितहानी झालेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने ५ लाखांची मदत देण्यात आली असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘मृत व्यक्तींमध्ये जे शेतकरी आहेत, त्यांना ‘दिवंगत गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने’चा लाभ देण्याची सूचना कृषी विभागाला करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे विद्युत खांब वाहून गेले व पडले होते. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करुन वीज पुरवठा सुरळीत केला आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या २०२१-२२ या वर्षासाठी एकूण ३७५ कोटी इतका निधी अर्थसंकल्पीत आहे. यामधून कोरोना उपाययोजनांसाठी ३० टक्के निधी म्हणजे ९८ कोटी ३ लाख २ हजार तसेच जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या उपाययोजनांसाठी ५ टक्के १६ कोटी ७२ लाख ५० हजार इतका निधी पुनर्विनियोजित करण्यात आला आहे.
तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एकही बालक उपचारापासून वंचित राहणार नाही, याची जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित लहान मुलांसाठी बाल कोविड अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आला आहे. या अतिदक्षता विभागात १९ आयसीयू व ८ ऑक्सिजन बेडची निर्मिती करण्यात आली आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
फोटो आहे...
.......................................................