मलकापुरातील हौसाई कन्या शाळेत नवनवीन उपक्रम सातत्याने सुरू असतात. संस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव पाटील, मुख्याध्यापक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकल्प राबविले जात आहेत. विद्यालयाच्या परिसरात पाऊल टाकले की बोलक्या भिंती सर्वांचे लक्ष वेधून घेतात. माहितीत भर टाकणारा हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे. आतील बाजूला असणाऱ्या भिंतीवर माहितीचा खजिना पोस्टर रूपाने साकारला गेला आहे. सुविचार, सूर्यनमस्कार, थोरांचे विचार, ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानातील ठळक बाबी तसेच घडामोडी चित्र आणि संदेश रूपाने मांडण्यात आल्या आहेत.
कऱ्हाड परिसरातील भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक घटनांची माहिती दिली आहे. विविध शास्त्रज्ञांची माहिती, स्वच्छता संदेश, आदींचा यामध्ये समावेश आहे. भिंत बोलकी करण्यासाठी अधिकराव पाटील, सागर पाटील यांचे सहकार्य मिळाले. मुख्याध्यापक बी. आर. पाटील, कला शिक्षक ऋषिकेश पोटे, कल्याण कुलकर्णी, पी. आर. कुवर, जे. पी. पाटील, आदींनी विशेष प्रयत्न केले.