कऱ्हाड : तळबीड येथील शेतीवरील वस्तीत सोमवारी रात्री बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला केला़ बिबट्याने एका शेतकऱ्याचे पाळीव कुत्रे फस्त केले़ गेल्या १५ दिवसांपासून तळबीड परिसरातील डोंगर पठारावर व शिवारात बिबट्याचा वावर आहे़ दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कुत्रे फस्त केलेल्या ठिकाणची पाहणी केली़ तळबीड गावच्या हद्दीतील औद्योगिक वसाहतीच्या डोंगरालगत पायथ्याला करमाळ नावाचे शिवार आहे़ या शिवारात संभाजी रामचंद्र कुंभार (रा़ तळबीड) यांचे शेत आहे़ शेतावरच जनावरांसाठी त्यांनी शेड बांधले असून रात्री झोपण्यासाठी ते या शेडमध्ये आले होते़ त्यावेळी बिबट्याने त्यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. बिबट्या कुत्र्याला ठार करून ऊसाच्या शेतात घेऊन गेला़ दुसऱ्या दिवशी सकाळी याची माहिती मिळाल्यावर वनरक्षक जगदीश मोहिते, वनपाल व कर्मचाऱ्यांनी करमाळ शिवाराची पाहणी केली़ गत पंधरा दिवसांपासून तळबीड शिवारात व डोंगरपायथ्यावर बिबट्याचे अनेक ग्रामस्थांना दर्शन झाले आहे़ मागील आठवड्यात गावातील शिवाजी शिरतोडे यांच्या दोन शेळ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या़ त्यावेळी बिबट्याला पाहून युवकांनी आरडाओरड केली़ वसंतगडावरील अनेक वासरे बिबट्याने फस्त केली आहेत़ वसंतगड व शेजारील डोंगरावर असणाऱ्या झाडीत बिबट्याचे वास्तव आहे़ मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्या थेट शिवारात दिसू लागल्याने शेतकऱ्यांत भितीचे वातावरण आहे़ बिबट्याच्या दहशतीने शेतमजूर कामावर जाण्यास टाळाटाळ करीत आहेत़ रात्रीच्या वेळी शिवारात पिकांना पाणी देण्यासाठी व इतर कामांसाठी जाणाऱ्या ग्रामस्थांचे प्रमाण कमी झाले आहे़ (प्रतिनिधी)
पाळीव जनावरांवर बिबट्याचा हल्ला
By admin | Updated: December 16, 2014 23:36 IST