कऱ्हाड : शेतात वैरणीला गेलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केला. धोंडेवाडी, ता. कराड येथील बेंद नावच्या शिवारात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर काले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विजय रामचंद्र पवार (वय ३७) असे जखमी युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, धोंडेवाडी येथील विजय पवार हा युवक गावा नजीकच्या बेंद नावच्या शिवारात वैरण आणण्यासाठी गेला होता. ओढ्याकाठी असलेले घासगवत कापत असताना गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक विजयवर हल्ला चढवला. या घटनेने विजय घाबरला. मात्र, त्याने जीवनाशी बिबट्याला प्रतिकार केला. मोठमोठ्याने आरडाओरडा करीत त्याने बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बिबट्याने त्याच्या खांद्यावर पंजा मारला. तसेच डोक्यालाही गंभीर इजा केली. विजयने जोरदार प्रतिकार केल्यानंतर बिबट्याने तेथून शिवारात धूम ठोकली. घटनेनंतर विजय गावात आला. तेथून त्याला काले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिक्षेत्र वनाधिकारी तुषार नवले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याठिकाणी भेट दिली. परिसरात बिबट्याचा शोध घेण्यात आला. या घटनेने परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे.
Satara: गवत कापणाऱ्या युवकावर बिबट्याचा हल्ला, कऱ्हाड तालुक्यातील घटना
By संजय पाटील | Updated: April 5, 2024 12:40 IST