कऱ्हाड : बेलवडे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील शेरी नावाच्या शिवारात बिबट्याने पाळीव श्वानावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला. शुक्रवारी पहाटे घडलेली ही घटना सकाळी उघडकीस आली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा हा हल्ला कैद झाला असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे.
बेलवडे बुद्रुक येथील शेरी शिवारात महेश बाळासाहेब मोहिते यांचा अथर्व पोल्ट्री फार्म आहे. या शेडवर बांधलेल्या श्वानावर बिबट्याने शुक्रवारी पहाटे हल्ला केला. या हल्ल्यात श्वान जागीच ठार झाले. शुक्रवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली. तसेच ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यानंतर याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बेलवडे बुद्रुक येथील इथुली शिवारातील वस्तीवरील श्वानावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले होते. त्यानंतर काही दिवसातच ही दुसरी घटना घडल्याने शेतकरी शिवारात जाण्यास घाबरत असून शेतीच्या कामाचा खोळंबा होत आहे. बेलवडे बुद्रुकसह कालवडे, कासारशिरंबे, कासेगाव, वाठार, काले परिसरात बिबट्याचा वावर असून त्याच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक श्वान, शेळ्या ठार झाल्या आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वन विभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
- चौकट :
बेलवडेत गत काही दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन श्वान ठार झाले आहेत. त्यामुळे वस्तीसह शेत-शिवारात जाण्यास शेतकऱ्यांना भीती वाटू लागली आहे. बिबट्याचा परिसरात वावर असल्याने, याबाबत पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी बेलवडेसह परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाकडे याआधीच केली आहे. मात्र, याकडे वन विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
- प्रदीप मोहिते
ग्रामस्थ, बेलवडे बुद्रुक
फोटो : ०२केआरडी०७
कॅप्शन :
बेलवडे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.