पाटण : तालुक्याच्या राजकारणात अलीकडे मोठा बदल जाणवू लागला असून, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून तालुक्यातील दोन्ही नेते महाविकासच्या आघाडी धर्माचे पालन करत असल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आणि त्यावरून होणारा पारंपरिक श्रेयवाद यावेळी जनतेला दिसला नाही. त्यामुळे आगामी काळात तालुक्यात देसाई आणि पाटणकर गटाच्या मनोमिलनाची नांदी आहे की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे.
पाटण तालुक्यात यापूर्वी एखाद्या सोसायटीची निवडणूक झाली तरी जोरदार श्रेयवाद दिसून येत होता. तसेच यापूर्वीचा इतिहास पाहता ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर श्रेयवाद आणि प्रसिद्धीपत्रके एकमेकांविरोधात काढली जात होती. जिल्ह्यातील जनतेने हे पाहिले आहे. तसेच तालुक्याच्या पाटणकर आणि देसाई गटाच्या नेत्यांचा एकमेकाविरोधातील कलगीतुराही तितकाच गाजलेला आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून म्हणजेच एक वर्षापासून तालुक्यातील शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर या दोन्ही नेत्यांनी एकमेकावर टीका अथवा आरोप केल्याचे ऐकीवात नाही. एवढेच काय तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी हातात हात घालून काम केले. त्यानंतर तालुक्यात तब्बल १०७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. ग्रामपंचायत निवडणुकांचा हा सर्वांत मोठा टप्पा होता. त्यामध्ये ३५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये मंत्री शंभूराज देसाई यांना चांगले यश मिळाले, तर पाटणकर गटाला कमी ग्रामपंचायती मिळाल्या. मात्र, या जय-पराजयानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर होणारी चिखलफेक किंवा टीका यावेळेस तालुक्यातील जनतेला ऐकावयास मिळाली नाही.
याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून, अशी काय जादू झाली की दोन्ही नेते एकामेकांविरोधात टीका करण्याचे थांबले आहेत, असा प्रश्न जनतेला पडला आहे. टीका आणि श्रेयवाद थांबला, ही गोष्ट तालुक्यातील जनतेसाठी चांगली बाब असून, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी देसाई आणि पाटणकर गट यांच्या मनोमिलनाचे संकेत मिळत आहेत.
- चौकट
शंभूराज देसाईंवर वरिष्ठ पातळीवरून दबाव?
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे गृहराज्यमंत्री आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा दबाव साहजिकच शंभूराज देसाई यांच्यावर दिसून येतो. त्यामुळे मंत्री झाल्यापासून त्यांनी मोठा संयम दाखविला असल्याचे दिसते. त्यामुळे साहजिकच माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजित पाटणकर यांनीही तशीच भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
फोटो : २९शंभूराज देसाई
फोटो : २९सत्यजित पाटणकर