राष्ट्रवादीच्या नेत्याची भूमिका गुलदस्त्यात
मतरांसह इच्छूक गॕसवर
''कृष्णा''त दुरंगी लढतीची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : पाच तालुक्यांचे राजकीय भवितव्य ठरणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी मोहिते अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनोमिलन अंतिम टप्प्यात असून, ‘कृष्णा’त दुरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे. मनोमिलनासाठी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्ते आघाडीवर तर राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात दिसत आहे. या सर्व वाटाघाटीत अर्ज माघारीपर्यंत मतदारांसह इच्छुक मात्र गॅसवर असल्याचे दिसत आहे.
पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत ३०५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी २२ अर्ज बाद झाले तर ७० दुबार वगळता २१३ अर्ज मैदानात राहिले. २१ जागांसाठी २१३ म्हणजे सर्वच नेत्यांना अर्ज माघारीसाठी करतच करावी लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना पाहावयास मिळण्याची शक्यता कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. एकीकडे मोहिते मनोमिलनासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू असून, बैठकांवर बैठका सुरू आहेत, तर दुसरीकडे भोसलेंसह कार्यकर्त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली असल्याचे खात्रीलायक वृत आहे.
मनोमिलनाचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. केवळ दोन-तीन जागांसाठीचा तिढा सुटला की मनोमिलन किंवा महाआघाडी रिंगणात उतरेल आणि कारखाना निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत डॉ. इंद्रजित मोहिते आणि विरोधी अविनाश मोहिते गटाला एकत्र आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पुढाकार घेतला आहे. दोन्ही मोहिते गटांनी एकत्र यावे यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू असल्याचे गेल्या काही दिवसांपासून बोलले जात आहे. नामदार जयंत पाटील यांची कारखाना निवडणुकीत भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, मात्र ती अजून स्पष्ट नाही. त्यांच्याशिवाय माजी मंत्री स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांचा गट, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा गट त्यांची ही भूमिका महत्त्वपूर्ण ठरते असा मागील काही निवडणुकीतील इतिहास आहे. या सर्व वाटाघाटीत अर्जमाघारीपर्यंत मतदारांसह इच्छुक मात्र गॕॅसवर असल्याचे दिसत आहे.
चौकट
दुरंगी लढत झाल्यास निवडणकीत रंग
भाजपा नेते डॉक्टर अतुल भोसले यांना मानणाऱ्या गटाची डॉ. सुरेशा भोसले यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्यावर सत्ता आहे. तर राष्ट्रवादीचे नेते अविनाश मोहिते आणि काँग्रेसचे दिवंगत नेते स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांचे चिरंजीव डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सत्ताधाऱ्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. २०१० साली कारखाना निवडणुकीत अविनाश मोहिते यांनी ऐतिहासिक सत्तांतर घडवले. डॉ. इंद्रजित मोहिते आणि सत्ताधारी भोसले गटाचा पराभव केला होता. मात्र २०१४ मधील विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय गणिते बदलून २०१५ साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती. त्या वेळी क्राॅस वोटिंगमुळे फटका बसला होता. या निवडणुकीत दुरंगी लढत झाल्यास निवडणुकीत रंग भरला जाणार आहे.