सातारा : ढगांचा गडगडाट अन् विजांच्या कडकडाटासह रविवारी सायंकाळी चार वाजल्यापासून अवकाळी पावसाने जिल्ह्यातील काही भागांत हजेरी लावली. सातारा शहरात गारांचा पाऊस झाला. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे सातारकरांची दाणादाण उडाली. सातारा-लोणंद रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत वाहने जात होती. फलटण तालुक्यात काही ठिकाणी पाऊस झाला. ग्रामीण भागात सुगी सुरू असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.सातारा शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उष्णता जास्त जाणवत होती. मात्र, पाऊस पडण्याची चिन्हे नव्हती. अशातच सायंकाळी पाचच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसास सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने बाजारपेठेत विक्रेते, ग्राहकांची धावपळ झाली. रस्त्यावरील विक्रेत्यांनी माल झाकून ठेवला, तर नागरिकांनी दुकानांच्या आडोशाला आधार घेतला. जोरदार पावसामुळे ओढे-नाले वाहिले. त्यामुळे नाल्यातील कचरा रस्त्यावर साचला. काही भागात गारांसह पाऊस झाला. मुलांनी पावसात जाऊन गारा वेचण्याबरोबर पावसात भिजण्याचा आनंद घेतला. दरम्यान, सातारा तालुक्यातील अंगापूर परिसरात सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण होते. मात्र, रात्री आठनंतर पावसास सुरूवात झाली. विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. त्यामुळे लोकांची पळापळ झाली. माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरातही सायंकाळच्या सुमारास पाऊस झाला. काही वेळानंतर पाऊस थांबला. तरीही वीजांचा कडकडाट सुरू होता. वारेही वाहत होते. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. (प्रतिनिधी)आदर्की : फलटण पश्चिम भागात रब्बी हंगामातील सुगीला सुरुवात झाली आहे. रविवारी सायंकाळी चार वाजता पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगली तारांबळ उडाली. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू काढणी व मळणीची धांदल सुरू आहे. अशातच चार वाजता विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला.शेंद्रे : शेंद्रे परिसरात सुगीचे कामे सुरू आहेत. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. काही शेतकऱ्यांनी ज्वारीची मळणी केली आहे. धान्याची पोती घरी घेऊन जाण्यापूर्वीच पावसात भिजली. यामध्ये गहू, ज्वारीचे नुकसान झाले आहे. कडबा अजून रानात असल्याने पावसात भिजला आहे. माती लागल्यामुळे जनावरे तो खात नाहीत. त्यामुळे आधीच दुष्काळ त्यात तेरावा... अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.पुसेगाव : पुसेगाव परिसरात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. अचानक आलेल्या वादळी पावसाने आठवडा बाजारातील नागरिक, वीटभट्टी कामगारासह शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. ज्वारी, गहूसारखा सालभराचा पसा कुडता असलेला आणि तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेऊ नये, अशी धारणा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.सध्या खटाव तालुक्याच्या उत्तर भागात रब्बी हंगाम सुरू आहे. रब्बी हंगामातील पेरणी झाल्यापासून पावसाने या भागात चांगलीच पाठ फिरवली होती. या भागातील नदी, ओढे आटून विहिरींची पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने रब्बी हंगामातील पिकांची जोपासना करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली होती. रात्रीचा दिवस करत शेतकऱ्यांनी शेतात असलेल्या पिकांना पाणी देऊन कसेबसे पीक हाताशी आणले आहे. पण या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गात चांगलीच धास्ती निर्माण केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शेतात ज्वारीची काटणी, कडबा बांधणे, हरबरा काढणे, गहू, हरभरासह ज्वारीची वाळवणी, नुकत्याच काढलेल्या पिकांची मळणी जोरात सुरू आहे. ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने दरवर्षीपेक्षा लवकर आलेली सुगी उरकण्यावर सध्या शेतकरी वर्गात धांदल सुरू आहे. अशातच रविवारी सकाळपासून वातावरणात कमालीचा उखाडा जाणवत होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास आकाश ढगांनी व्यापून लांब दूरवर विजांचा कडकडाट सुरू झाला. मेघगर्जनेसह या भागात केवळ हलक्या सरी सुमारे १५ मिनिटे कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मोठे भांडवल गुंतवल्याने वीटभट्टी मालकांचे या हलक्या सरीच्या पावसाने चांगलेच धाबे दणाणले. तयार झालेला विटांचा माल झाकण्यासाठी कागद, ताडपत्र्या यांचा वापर करून पावसाच्या अगोदर माल झाकण्यासाठी त्यांची चांगलीच गडबड झाली. (वार्ताहर)
गारांसह अवकाळी पावसाचे थैमान
By admin | Updated: February 29, 2016 00:58 IST