वाई : यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीतील सह्याद्रीनगरमधील शोभा चंद्रकांत शेणोलीकर या परदेशी महिलेचा बंद अवस्थेतील आरसीसी बांधकाम केलेला दोन मजली बंगला प्रशांत मारुती गुरव यांच्या नावे काही दुय्यम निबंधकांच्या मदतीने बोगस दस्त केले. तसेच तो बंगला रात्रीत पाडण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित दुय्यम निबंधकांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते विकास शिंदे यांनी केली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘संबंधित परदेशी महिलेने सह्याद्रीनगरमधील प्रा. शामराव शिंदे यांच्याकडून २२ एप्रिल १९९८ रोजी जमीन खरेदी केली. तिने त्या जागेवर आरसीसीमध्ये दोन माजली बंगला बांधून ती राहत होती. काही वर्षांपूर्वी ती परदेशी महिला अचानक गायब झाली. ती वास्तू अनेक वर्षे बंद अवस्थेत होती. त्याचा फायदा घेऊन काहींनी दुय्यम निबंधक व संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत करून बोगस दस्त कोणतीही महत्त्वाची कागदपत्रे दाखल केली. त्यानंतर १८ सप्टेंबर २०२० रोजी बोगस आधार कार्ड, पॅन कार्ड वापरून बोगस व्यक्ती उभी करून कवडीमोल भावात दस्त केला. त्याच दिवशी तलाठ्यांनी फेरफार करून संगणकीकृत नोंद केली. त्यानंतर मंडलाधिकारी यांनी सूची क्र. २ वरून १९ ऑक्टोबर २०२० रोजी ही फेरफार नोंद प्रमाणित केली. शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्व नोंदी त्वरित करून घेतल्या आहेत. तसेच हा दस्त यशवंतनगर ग्रामपंचायतीत नोंदणीसाठी आला असता ही बाब उघड झालेली आहे. बोगस दस्त करणाऱ्या दुय्यम निबंधक व संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
फोटो :
०५वाई-दस्त
यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीतील हा बंगला रात्री पाडण्यात आला. या जागेचा बोगस दस्त केल्याचा आरोप होत आहे.