कोरेगाव : गेल्या दीड वर्षांपासून वापराविना बंद असलेले साखळी पुलाजवळील सार्वजनिक स्वच्छतागृह येत्या १२ तारखेला खुले करण्याचा निर्णय कोरेगाव नगरपंचायतीकडून घेण्यात आला. यानंतर सोनेरी ग्रुपच्या बेमुदत उपोषणाची सांगता करण्यात आली.
कोरेगाव नगरपंचायतीने विशेष उपक्रमातून सुमारे ३० लाक्ष रुपये खर्चातून उभारलेल्या साखळी पुलाजवळील सार्वजनिक शौचालयाचे काम दीड वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. परंतु ठेकेदार व नगरपंचायत यांच्यामधील हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण न झाल्याने स्वच्छतागृह वापराविना बंद अवस्थेत होते. हे काम सुरू झाल्यापासून त्याठिकाणी दुसरी पर्यायी व्यवस्था सुध्दा केली गेली नव्हती. परिणामी तालुक्यातून दररोज येणाऱ्या हजारो नागरिकांना सार्वजनिक स्वच्छतागृहाविना अनेक अडचणी सहन कराव्या लागत होत्या.
नगराध्यक्षा रेश्मा कोकरे, उपनगराध्यक्षा मंदा बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगरसेवक राहुल बर्गे, किशोर बर्गे, नगरअभियंता मिलिंद काकडे, धनंजय भुजबळ यांनी उपोषणकर्त्यांनाा लेखी पत्र देत, उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणाऱ्या ठेकेदाराला दूरध्वनीवरून संपर्क करून येत्या २१ तारखेला स्वच्छतागृह सुरू करण्याचे सांगून, तसा निर्णय उपस्थितांसमोर जाहीर करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनीही उपस्थित राहून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
नगरपंचायतीने दिलेल्या पत्रानंतर उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर करून, स्वच्छतागृहाच्या प्रश्नावर कायम पाठपुरावा करत राहणार असल्याचे सोनेरी ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे, सोनेरी सखी मंचच्या अध्यक्षा संगीता बर्गे, पृथ्वीराज बर्गे, राजेश बर्गे, अजित बर्गे, सचिन कदम, अवधूत कालेकर, विजय ओसवाल यांनी सांगितले.