मलकापूर : आगाशिवनगरसह शहरात गटारालगत सांडपाणी वाहून जाण्यासाठी खुदाई करण्यात आली आहे. काम झाल्यानंतर ही चर मुजवण्याचे काम व्यवस्थित न केल्यामुळे प्रत्येक कॉलनीत प्रवेश करताना खड्डाच प्रत्येकाचे स्वागत करीत आहे. तसेच केबलच्या कामासाठी उपमार्गावर खोदलेले व पावसाने पडलेले खड्डे धोकादायक बनले आहेत. जागोजागी खड्डे पडल्यामुळे नागरिकांसह वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यावर पडलेले हे खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
मसूर ते निगडीपर्यंत रस्त्याची अवस्था दयनीय
मसूर : मसूर ते निगडी या सुमारे दोन किलोमीटर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मसूर ते निगडी हा जवळचा रस्ता म्हणून ग्रामस्थ त्याचा वापर करतात. मात्र, गत दोन वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याने प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने पाहणी करून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कऱ्हाड तालुक्यातून थंडी गायब; उकाडा वाढला
कोपर्डे हवेली : कऱ्हाड तालुक्यात गत आठ दिवसांपासून थंडी गायब होऊन तापमानात वाढ झाली आहे. दिवसा उन्हाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उकाडा जाणवत आहे. थंडीच्या दिवसांत पिकांना बहर येतो. त्यामुळे खरीप पिकांची काढणी होताच शेतकरी रब्बी पिकांची टोकणी करतात. सध्या काही ठिकाणी टोकणीचे काम सुरू आहे; तर बहुतांश क्षेत्रावर टोकणी होऊन पिकांची उगवण झाली आहे. मात्र, थंडीच गायब झाल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. सध्याचे वातावरण रब्बी पिकांना हानिकारक असून त्याचा परिणाम पीकवाढीवर दिसत आहे. शाळू, हरभरा पिकाला थंडीचे वातावरण पूरक असते.
फुटलेल्या झाकणातून केमिकलची दुर्गंधी
मलकापूर : कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यालगतच्या आरसीसी गटारींची साफसफाई करण्यासाठी ठिकठिकाणी चेंबर तयार केले आहेत. त्या चेंबरवर झाकणेही टाकण्यात आली होती. मात्र, दर्जाहीनतेमुळे येथील मोरया कॉम्प्लेक्स ते ढेबेवाडी फाटा परिसरात तीन ठिकाणी झाकणे फुटून वर्ष उलटून गेले आहे. या ठिकाणची झाकणे फुटल्यामुळे नाल्यात दगड व मातीचा खच पडला आहे. त्यामुळेच या ठिकाणी नाला तुंबला आहे. शिवाय या उघड्या गटारीमध्ये केमिकलमिश्रित पाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन परिसरातील सर्वच चेंबरची झाकणे बदलावीत. गटर बंदिस्त करावे, अशी मागणी होत आहे.
पाटण ते चाफोली रस्त्याची दुरवस्था
पाटण : पाटण ते चाफोली रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. पाटणच्या पश्चिम बाजूकडे चिपळूण महामार्गापासून चाफोली रस्त्याला सुरुवात होते. मात्र, महामार्गापासून ग्रामीण रुग्णालयापर्यंत या रस्त्याला पावसाळ्यात अनेक ठिकाणी तळ्याचे स्वरूप येते. दोन-दोन फुटांचे खोल आणि आकार वाढत चाललेले खड्डे वाहनधारक व प्रवाशांना त्रासदायक ठरत आहेत.
अनेक वर्षांपासून नाल्यांची सफाईच नाही
मलकापूर : कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या आरसीसी नाल्यांची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. याचे सर्वाधिकार याच विभागाकडे आहेत. मात्र, नालेनिर्मितीपासून एकदाही या नाल्यांची साफसफाई केलेली नाही. त्यामुळे या परिसरात अनेक ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही ठिकाणी दगड, माती व कचऱ्यामुळे नाले तुंबले आहेत; तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झुडपेे वाढली आहेत. डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने नाल्यांची सफाई करणे गरजेचे आहे.