फलटण : ‘प्रत्येक खेळाचे स्वरूप बदलत चालले असून, खेळात व्यावसायिकता आली आहे. सरकारही खेळाडूंच्या पाठीशी उभे राहत आहे. त्यामुळे खेळाडूंनी जिद्द व चिकाटी ठेवून देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे ध्येय ठेवावे,’ असे आवाहन राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.खासदार शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त फलटण येथे ५२ व्या पुरुष, महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, पंचायत समिती सभापती स्मिता सांगळे, जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चरणजित जाधव, नगराध्यक्षा सारिका जाधव, उपनगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, ज्येष्ठ नेते डॉ. विजयराव बोरावके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे उपस्थित होते.रामराजे म्हणाले, ‘फलटणला खो-खो खेळ रुजलेला असल्याने या स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. संयोजनात आम्ही कोठेही कमी पडणार नसलो तरी राज्यातील विविध भागांतून आलेल्या खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने खेळ करावा. सर्वच क्षेत्रात व्यावसायिकता येत असताना क्रीडा क्षेत्रही मागे नाही. क्रिकेट, टेनिस, बॉक्सिंग हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. सरकार खेळाडूंच्या पाठीशी ठाम असून, जिद्द व चिकाटीने खेळ करत देशाचे नाव उज्ज्वल करावे. देशासाठी प्रतिनिधीत्व करण्याची जिद्द मनाशी बाळगावी.’मोहिते-पाटील म्हणाले, ‘ग्रामीण भागात कुस्ती, कबड्डी, खो-खो हे रुजलेले व सातत्याने खेळले जाणारे खेळ आहेत. जगाच्या पातळीवरील या खेळाडूंना मान्यता मिळाली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंच्या पाठीशी राहू. फलटणमधील स्पर्धांचे आयोजन भव्यदिव्य झाले असून, खेळाडूंनी खेळाचा आनंद लुटावा. देशपातळीवर नाव उंचवावे. त्यामुळे गावाबरोबरच संपूर्ण देशाला अभिमान वाटणार आहे.’ (प्रतिनिधी)ललिता बाबरसारख्या खेळाडूंना सहकार्य‘माणसारख्या दुष्काळी तालुक्यातून गरीब परिस्थितीत झगडत पुढे येऊन ललिता बाबरने आॅलिम्पिकमध्ये स्थान मिळविले आहे. तिच्या जिद्दीचा आम्हाला अभिमान असून, तिच्यासारखे खेळाडू पुढे येत असतील त्यांना प्राधान्याने सहकार्य करू,’ अशी ग्वाहीही रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.
खो-खो खेळाडूंच्या पाठीशी सरकार ठाम !
By admin | Updated: October 8, 2015 21:52 IST