खटाव : ग्रामीण भागातील ग्रामदेवतेच्या यात्रा तसेच जत्रांचा मुहूर्त हा मार्च व एप्रिल महिन्यात असतो आणि याचदरम्यान उत्सवाची तयारीदेखील होत असते; परंतु गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षी पुन्हा एकदा कोरोनाचे सावट तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गावोगावच्या यात्रांवर कोरोनाचे सावट आले आहे.
खटाव तालुक्यातील खातगुणमधील राजे बागसवार यांचा हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा सांगणारा तसेच महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून येणाऱ्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणारा उरूस, मानाचा झेंडा तसेच पालखी सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला. कोरोनाचे संकट तसेच भाविकांची होणारी गर्दी टाळण्याकरिता पुसेगाव पोलीस स्थानक, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करताना यात्रा कालावधीत भाविकांनी खातगुणमध्ये येऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन व खातगुण ग्रामपंचायत व यात्रा कमिटी यांच्यातर्फे करण्यात आले होते. कोरोनाचे वाढते संकट पाहता, मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत कोरोनाचे सर्व नियम पाळून धार्मिक विधी व पालखी पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुसेगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मंचले यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याची खबरदारी प्रशासन घेत होते.
०७ खटाव
कॅप्शन : खातगुणमधील राजे बागसवार यांचा उरूस व मानाच्या पालखीचे पूजन मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झाले.