‘खंडवा’ची शस्त्रं साताऱ्यात जप्तपिस्तूल, काडतुसासह दोघांना अटक : शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाईसातारा : मध्य प्रदेशातील खंडवा येथील पिस्तूल साताऱ्यात विकण्यासाठी आलेल्या दोघांना शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. त्यांच्याकडून पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, त्या पिस्तुलाची किंमत सुमारे एक लाख १५ हजार इतकी आहे.अजमेर अकबर मुल्ला (वय २३, रा. केसरकर पेठ, सातारा, मूळ रा. नागठाणे, ता. सातारा), सचिन नामदेव भिसे (२९, रा. बुधवार पेठ, कऱ्हाड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज गुरुवारी दुपारी रविवार पेठेतील एका शाळेच्या पाठीमागे दोन युवक पिस्तूल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यांनी टीमला तेथे तत्काळ पाठविले. त्यांनी शाळेच्या पाठीमागे लपून बसलेल्या मुल्ला आणि भिसेला झडप घालून पकडले. त्यानंतर दोघांनाही शहर पोलीस ठाण्यात आणले. एकाकडे पिस्तूल, तर दुसऱ्याकडे जिवंत काडतूस सापडले. गेल्या वर्षी या दोघांवर सांगली येथे पिस्तूल तस्करीचा गुन्हा दाखल झाला असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. मध्य प्रदेशातील खंडवा येथून हे पिस्तूल विकत घेतले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक आवळे, पोलीस नाईक संतोष पवार, संतोष महामुनी, संजय शिर्के, प्रवीण फडतरे, नीलेश यादव, नीलेश काटकर, विशाल सर्वगोड, किशोर वायदंडे, दीपक झोपाळे, नेताजी गायकवाड यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)पिस्तूल खरेदी करणारा कोण?मुल्ला व भिसे या दोघांनी ‘पिस्तूल विकण्यासाठी साताऱ्यात आलो आहोत’, असे सांगितले आहे. मात्र, ते पिस्तूल नेमके कोणाला विकणार होते हे अद्याप समोर आलेले नाही. पोलीस पिस्तूल खरेदी करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचले, तरच पिस्तूल तस्करीमधील मोठी साखळी उघड होईल.
‘खंडवा’ची शस्त्रं साताऱ्यात जप्त
By admin | Updated: November 7, 2014 00:09 IST