खंडाळा : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी चुरशीने लढत झाली होती. यामध्ये अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागांवर बाजी मारली असून, खंडाळा तालुक्यात आमदार मकरंद पाटील यांचाच गजर होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींपैकी ३५ जागांवर राष्ट्रवादी, काँग्रेसने ८, भाजपने २, शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीने १, सर्वपक्षीय संमिश्र गटाने एका ग्रामपंचायतीवर बाजी मारली. तर एका ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी व काँग्रेसला सत्तांतराच्या जागा मिळाल्या आहेत. तालुक्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत १४ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले असून, काही दिग्गज उमेदवारांना पराभूत व्हावे लागले आहे.खंडाळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असून, काँग्रेसचे संख्याबळ घटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने काही गावांत काठावरचे बहुमत मिळाली. तर काही ठिकाणी सत्ता गमावली आहे. तर काँग्रेसचेही अनेक गावांत पानिपत झाले. भादे, अहिरे, अंदोरी, वाघोशी, कोपर्डे, पाडळी, पिंपरे बुद्रुक, बोरी, निंबोडी, शिवाजीनगर, बाळूपाटलाचीवाडी येथे सत्तांतर घडवत राष्ट्रवादीने विजयश्री खेचून आणली आहे. तर खेड बुद्रुक, अजनुज, मिरजे, वाठार बुद्रुक, बावकलवाडी, नायगाव येथेही सत्तांतर झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत नशीब अजमावत असलेल्या दिग्गजांपैकी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शारदा जाधव, राष्ट्रवादीचे राजेंद्र नेवसे, भाजपचे अभिजित खंडागळे यांचा दारुण पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात प्रतिष्ठेच्या केलेल्या अंदोरी आणि बावडा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने सत्ता राखली असून, नायगावमध्ये राष्ट्रवादी विरोधात सर्व पक्षीय पॅनेलने सर्व जागा जिंकून परिवर्तन घडविले. शेडगेवाडी व मरिआईचीवाडी या दोन ग्रामपंचायतींत राष्ट्रवादी अंतर्गतच गटात परिवर्तन झाले. कर्नवडी येथे दोन्ही पक्षांना समान तीन जागा मिळाल्या आहेत.पळशी ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांचे सुपुत्र आशुतोष याच्या विरोधात प्रतिष्ठेची लढाई केली असली तरी राजकरणात मुरब्बी असल्याचे भरगुडे-पाटील यांनी दाखवित वर्चस्व सिद्ध केले आहे. त्याचबरोबर कोपर्डे येथे राष्ट्रवादीचे रमेश शिंदे यांनी व बावडा येथे मनोज पवार यांनी सत्ता अबाधित राखली.
खंडाळ्यात आमदार गटाचाच गजर!
By admin | Updated: August 6, 2015 22:37 IST