वाई : ‘सध्या पाणी प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा असून, राज्य व केंद्र शासनाने पाणी प्रश्नाला प्रथम प्रधान्य दिले आहे. वेगवेगळ्या निवडणुका होत असतात, लोकांनी आपला विकास साधत असताना पक्षीय भूमिका बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र यावे,’ असे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केले. गुळुंब, ता़ वाई येथे ‘जलयुक्त शिवार’ उपक्रमास भेट दिल्यावर ते बोलत होते. प्रशासन, सामाजिक संस्था व लोकसहभागातून गुळुंब येथे ‘जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत ओढाजोड प्रकल्प सुरू आहे. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी माहिती दिली़ गुळुंबच्या सरपंच अल्पना यादव म्हणाल्या, ‘ओढाजोड प्रकल्प हा प्रशासन, लोकसहभागातून व विविध संस्थांच्या मदतीतून राबविलेला महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. याचा गुळुंब, चांदकच्या शेतीसाठी फायदा होणार आहे़ ’ सरपंच अल्पना यादव यांनी राज्यपाल, पालकमंत्री विजय शिवतारे यांचा सत्कार केला. गुळुंब येथील या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, वाईचे प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, वाई पंचायत समितीच्या सभापती उमा बुंलुंगे, गटविकास अधिकारी दीपा बापट, बाजार समितीचे उपसभापती रवींंद्र जाधव, प्रताप यादव, तसेच गुंळुंब, चांदक गावचे ग्रामस्थ व विविध विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पक्षीय भूमिका बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र या!
By admin | Updated: May 4, 2015 00:23 IST